टेंभीनाक्याची दहिहंडी लोकल ट्रेनमध्येही लाईव्ह दिसणार

ठाणे: जी दहिहंडी सुरु करुन धर्मवीर आनंद दिघे यांनी दहिहंडी उत्सवाचा महाउत्सव केला ती टेंभीनाक्याची मानाची दहिहंडी यावेळी उत्साहात साजरी होणार असून यूट्यूब टिव्ही चँनलसह लोकल प्रवासात देखील प्रवाशांना लाईव्ह पाहता येणार आहे, अशी माहिती शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी दिली.

धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंभीनाका येथे दहिहंडी उत्सव सुरु करुन साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन ठेवले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव त्याच जोमात, उत्साहात साजरा होत असून आनंद दिघे यांंनी सुरुवात केलेली परंपरा पुढे सुरु ठेवण्यात आली आहे.

हा दिमाखदार सोहळा साजरा करताना ठाणे आणि मुंबईतील गोविंदा पथकांकरीता वेगवेगळ्या दहीहंड्या असून प्रत्येकी रोख बक्षीस व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. या हंडीसाठी जाहीर करण्यात आलेले बक्षीस हे मानवीशक्ती असलेल्या थरांंकरीता आहे.

टेंभीनाक्यावरील दहीहंडीचे टिझर प्रकाशित झाले असून मध्य रेल्वेच्या २० लोकल व पश्चिम रेल्वेच्या २० लोकलमधील प्रत्येक डब्यातील स्क्रीनवर दाखविले जात आहेत. तसेच दहीहंडीच्या दिवशी टेंभीनाक्यावरील उत्सवाचे थेट प्रक्षेपण प्रवाशांना पाहायला मिळणार असल्याचे नरेश म्हस्के यांनी नमूद केले.