कल्याण लोकसभेची जागा लढायची आणि जिंकायचीच

स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचे आदेश

मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. “ही लोकसभेची जागा आपण लढवायची आणि कोणत्याही परिस्थितीत जिंकायची,” असा आदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला आहे.

उद्धव ठाकरे यांनी आज कल्याणमधील ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. केंद्र सरकारने तातडीचं अधिवेशन बोलवलं आहे. त्यामुळे लवकरच निवडणुका लागू शकतात. त्या दृष्टीने आपली तयारी असायला हवी, अशी सूचना त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिली. यावेळी ते म्हणाले की, आपण कल्याण लोकसभा मतदारसंघ 1996 साली भाजपकडून भांडून घेतला होता. त्यामुळे या निवडणुकीत सुद्धा लोकसभेची ही जागा आता आपण लढवायची आणि कुठल्याही परिस्थितीत जिंकायची.”

“समोरच्याची ताकद कितीही असू द्या, कुठलाही उमेदवार समोर देऊ द्या, तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचून प्रचार करा. स्थानिक पदाधिकाऱ्यांना भेटून आपली संघटना आणखी मजबूत करा,” असे आदेशही उद्धव ठाकरेंनी बैठकीत नेत्यांना दिले आहेत.

इंडिया आघाडीच्या बैठकीचं यजमानपद आपल्याकडे होतं. त्यामुळे इंडिया आघाडीत असताना मला काही ठिकाणी दौरे करावे लागतील. माझं आपल्या मतदारसंघात येणं-जाणं कमी होईल तरीदेखील तुम्ही जोमाने तयारी करा, असं उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या बैठकीत आपल्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना म्हटलं.

या मतदारसंघात संघटना मजबूत करण्यासाठी नवीन पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी यांची नियुक्ती करून त्यांना पदाचे वाटप करण्यात आले. ठाणे लोकसभा मतदार संघातील संघटना मजबूत करून ही जागा देखील मताधिक्याने जिंकायची, असे आवाहन श्री.ठाकरे यांनी केले. कल्याण लोकसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत मात्र कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याचे खा. राजन विचारे यांनी सांगितले. या दोन्ही मतदार संघात संघटना आणखी मजबूत करण्याच्या सूचना त्यांनी केल्याचे श्री. विचारे यांनी सांगितले.