ठाणे: ठाण्यातील जांभळी नाका येथे महा दहीहंडी उत्सव साजरा होत असून यंदाचे हे १७ वे वर्ष आहे. ठाणे-मुंबईतील गोविंदा पथके आणि ठाणेकरांचेही हा उत्सव आकर्षण ठरेल, असा विश्वास आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने खा.राजन विचारे यांनी व्यक्त केला आहे.
या सोहळ्यास माजी मंत्री व युवानेते आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आदेश बांदेकर आदी मान्यवरही या दहीहंडीला भेट देणार आहेत. या महादहीहंडी बरोबर संगीताची मेजवानी आणि करमणुकीसाठी महाराष्ट्रातील पारंपारिक लोककला नृत्य मराठी-हिंदी गाणी असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत तर मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार यावेळी उपस्थित राहणार आहेत.
मुंबई गोविदासाठी बाळासाहेब ठाकरे नावाची एक लाख ११,१११, ठाणे येथील गोविंदा पथकासाठी आनंद दिघे नावाची एक लाख ११,१११ आणि महिलांसाठी माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या नावाची ५१ हजार रुपयाची रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
गोविंदा पथकांसाठी ज्युपिटर हॉस्पिटलतर्फे तज्ञ डॉक्टरांचे वैद्यकीय पथक रुग्णवाहिकेसह उत्सवाच्या ठिकाणी सज्ज राहणार आहे. त्यामध्ये कार्डियोलॉजीस्ट, ऑर्थोपेडिक व न्युरोलॉजिस्ट डॉक्टर सहभागी होणार आहेत. ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन स्थितीसाठी आवश्यकता भासल्यास पाच बेड आरक्षित करण्यात आले आहेत. गोविंदा पथकांसह प्रेक्षकांचाही बजाज अलायंझ कंपनीच्या सहकार्याने विमा उतरवण्यात येणार आहे.
दहिहंडीचे मनोरे रचत असताना शेवटच्या थरावर असणाऱ्या गोविंदाला ‘उदय आऊट डोअर’ या गिर्यारोहक संस्थेमार्फत सेफ्टी रोप देण्यात येणार आहे. जेणेकरुन गोविंदांचे खालचे थर कोसळले. तरी सर्वात वरच्या थरावर असणारा गोविंदा रोपच्या सहाय्याने सुरक्षित राहणार आहे.