२८ जणांनी लाखोंचा दंड थकवला * थकबाकीदारांचा फलक झळकला
ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकाच्या आवारात बेशिस्त वर्तन करणारे २८ रिक्षाचालक लाखोंचा दंड भरण्यास टाळाटाळ करत असून त्यांची नोंदणी आणि परवाना रद्द करण्याबाबतचा अहवाल वाहतूक शाखेने प्रादेशिक परिवहन विभागाला पाठवला आहे.
तब्बल २८ रिक्षाचालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे शहर वाहतूक विभागाकडूनन दंडात्मक कारवाई केली आहे. अशा रिक्षाचालकांवर ५० हजार ते दोन लाखांपेक्षा दंड प्रलंबित आहे व संबंधित रिक्षाचालक दंड भरण्यास उदासिन आहे. त्यामुळे ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाला संबंधित रिक्षा चालकांचे परमीट, बॅच नुतनीकरण आणि नोंदणी रद्द करण्याबाबतचा अहवाल वाहतूक शाखेकडून मिळाला असल्याची माहिती ठाणे आरटीओचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी ‘ठाणेवैभव’ ला दिली.
यातील काही रिक्षाचालकांच्या दंडाची रक्कम ही नव्या रिक्षाच्या खरेदीच्या किंमतीएवढी आहे. मात्र वाहतूक पोलिसांनीही या बेशिस्त रिक्षाचालकांना वठणीवर आणण्यासाठी कंबर कसली आहे. त्यांनी ठाणे स्थानकाच्या एका मोठ्या बॅनरवर नाठाळ रिक्षा चालकांची यादीच प्रसिद्ध केली. मात्र अशा चालकांचे धाबे दणाणले नसल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी आणि प्रादेशिक वाहन अधिका-यांनी दिली. चालकांवर वाहतूक पोलिसांनी दंडाची वारंवार कारवाई केली, त्यांना चलन भरण्यास सांगितले आहे. मात्र ती न भरल्याने दंडाची रक्कम चक्क पाच आकडी झाली आहे. ठाणे स्थानक परिसरात रिक्षाचालकांना शिस्त लावण्याकरीता ठाणे महापालिका, वाहतूक पोलीस आणि ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग यांनी दंड थोपटले आहेत.
स्थानकांमधून बाहेर पडणा-या प्रवाशांना हाताला धरून रिक्षामध्ये ओढत नेणे, आडमुठेपणा करणे, रस्त्यावर रिक्षा लावणे, भाडे नाकारणे, बेशिस्त रिक्षा पार्किंग, वृद्ध महिला आणि पुरुष प्रवाशांना नाकारून मानसिक त्रास देणे, प्रवाशांना भाड्यासाठी पाठलाग करणे आदी तक्रारी वाहतूक पोलिस आणि ठाणे आरटीओकडे सुरू आहेत. मात्र असे नाठाळ चालक अजिबात सुधारत नसल्याची माहिती ठाणे पश्चिम येथे राहणा-या संध्या जोशी यांनी सांगितले.
या २८ रिक्षाचालकांच्या वाहनाचे परमिट नूतनीकरण होणार नाही, असे सांगताना ‘त्या’ रिक्षा चालकांचे परमिट बॅच नूतनीकरण व रजिस्ट्रेशन रद्द करण्याबाबत अहवाल पाठवला आहे, असे वाहतूक पोलीस शाखेच्या निरीक्षकांनी सांगितले.