१५ ठिकाणी नो पार्किंग झोन घोषित
ठाणे: वागळे आणि वर्तकनगर भागातील वाहतूक कोंडीवर वाहतूक पोलिसांनी १५ ठिकाणी नो पार्किंग झोन, दोन ठिकाणी सम-विषम तर एक ठिकाणी समांतर पार्किंगची उपाययोजना केली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
वागळे वाहतूक उपविभाग विभाग परिसरातील श्रीनगर,सावरकर नगर, हजुरीरोड न २८, साठे चौक, समता नगर, वर्तकनगर, गावंड बाग, यशोधन नगर, आर.जे.ठाकूर महाविद्यालय, लक्ष्मीपार्क, देवदया नगर या भागातील अरुंद रस्त्यावर दुतर्फा गाड्या उभ्या केल्या जात असल्याने सकाळ-संध्याकाळी या भागातील नागरिकांना सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. वाहतूक पोलिसांनी या रस्त्यावर कधीही पार्किंगचे धोरण राबविले नव्हते, त्यामुळे अनेकांनी या रस्त्यांवर गाड्यांच्या पार्किंग बेकायदेशीरपणे सुरू केले होते. याबाबत जागरूक नागरिकांनी महापालिका आणि वाहतूक शाखेकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेऊन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विनय राठोड यांनी १५ ठिकाणी उजव्या आणि डाव्या बाजूला २४ तास नो पार्किग झोन जाहीर केले. दोन ठिकाणी सम आणि विषम पार्किंग तर एक ठिकाणी समांतर पार्किंग घोषित केली आहे.
श्रीनगर येथील बीएमसी कॉलनी गेट ते मनोज अपार्टमेंटपर्यंत रस्त्याच्या उजव्या बाजूस, मनोज अपार्टमेंट ते रूपरेखा स्टुडिओपर्यंत रस्त्याच्या डाव्या बाजूस, रूपरेखा स्टुडिओजवळ असलेल्या पुलावर दोन्ही बाजूस, रोड क्र.२८, गल्ली क्र. ३ रस्त्याच्या उजव्या बाजूस, हजुरी प्लॉट ए-३८ ते ४१ रस्ता क्र.११ पर्यंत रस्त्याच्या डाव्या बाजूस, वागळे रस्ता क्र.१० येथील टाटा शो रूम ते एमएसईबी कार्यालयपर्यंत रस्त्याच्या डाव्या बाजूस, महंत चेंबरच्या विरुद्ध ते साठे चौक पर्यंत रस्त्याच्या डाव्या बाजूस, समता नगर येथील जैन ट्रेडर्स समोर कॉर्नरला, वर्तक नगर येथील उडपी हॉटेलसमोर कॉर्नरला, गावंड बाग रत्नतेज धवल हिल्स बिल्डिंग समोरील एका बाजूस, यशोधन नगर येथील आईमाता मंदिर येथील नेत्रम आय केअर हॉस्पिटललगत कॉर्नरला, वर्तकनगर येथील लक्ष्मी पार्क सोसायटी ते सार्वजनिक शौचालयाच्या जवळ, समता नगर येथील अराडीया बिल्डिंग ते गगनगिरी बिल्डिंगच्या कडेला एका बाजूस, समता नगर येथील सुप्रभा ज्येष्ठ नागरिक संघ कॉर्नर, आणि जीएसटी भवन प्रवेशद्वाराच्या डाव्या आणि उजव्या बाजूस २४ तास नो पार्किंग करण्यात आले आहे. तर देवदया नगर मार्गावरील कॅनरा बँक ते निळकंठ हाईटपर्यंतआणि सावरकरनगर येथील ठाकूर कॉलेजजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूस पी-१ आणि पी-२ तर लक्ष्मी पार्क सोसायटी ते एन. जी. विहार सोसायटीपर्यंत समांतर पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.