कांदा-बटाटा बाजार एक दिवस बंद राहणार

नवी मुंबई: केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क ४० टक्के वाढवल्याने त्याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजारभावावर होणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच बाजार समिती मधून निर्यातशुल्क वाढीचा निषेध व्यक्त केला जात असून नाशिक येथील व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

या बंदला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी देखील पाठिंबा देणार असून गुरुवार २४ ऑगस्ट रोजी संपूर्ण कांदा बटाटा बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती येथील व्यापाऱ्यांनी दिली.

बाजारात कांद्याचे दर वाढत असताना केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४०टक्के शुल्क लादले आहे. याच्या निषेधार्थ राज्यातील सर्व बाजार समितीमधील व्यापारी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

वाशीतील कांदा-बटाटा व्यापाऱ्यांनी देखील या बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे. त्यामुळे
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील संपूर्ण कांदा-बटाटा बाजार गुरुवार २४ ऑगस्ट रोजी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संचालक अशोक वाळुंज यांनी दिली.

बंद मुळे कांदा दरात घसरण

वाशीतील बाजार समिती सुरू असल्याने कांद्याची आवक वाढली आहे. सोमवारी वाशी एपीएमसी बाजारात १३१ गाड्या दाखल झाल्या मात्र या बंदचा दरांवर परिणाम झाला असून दर घसरले आहेत. मागील आठवड्यात वाढत असलेल्या कांद्याच्या प्रतिकिलो दरात २-३ रुपयांनी घसरण झाली आहे. सोमवारी घाऊक बाजारात प्रतिकिलो कांदा १७-२२ रुपयांनी विक्री झाला आहे.