भाईंदर: वसई आणि विरार या शहरातील महत्वाच्या दोन भागांमध्ये लवकरच रोल ऑफ-रोल ऑन अर्थात रो-रो सेवा सुरु केली जाणार आहे. वसई किल्ला ते भाईंदर जेट्टी आणि विरार नारंगी ते सफाळे या दोन मार्गीवर ही रो रो सेवा चालवली जाईल. यामुळे वसई तालुक्याच्या पायाभूत सुविधांना चालना मिळेल.
नजिकच्या भविष्यात, रो-रो सेवा महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्थेचा अविभाज्य आधारस्तंभ असेल. लोकांचे हाल कमी करणे आणि वेळेची बचत आणि परिणामकारक मार्गाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर आणि आमदार राजेश पाटील यांनी रो-रो सेवा सुरु करण्याची मागणी केली होती. या मागणीची राज्य सरकारने दखल घेतली असून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक गुरसाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत रो-रो सेवा सुरु करण्याला हिरवा कंदील मिळाला आहे. या बैठकीत सर्वेक्षण आणि मार्ग निश्चित करण्याबाबत चर्चा झाली.
प्रवासाची सुलभता आणि मार्गावरील
पाण्याची रहदारी लक्षात घेऊन मार्ग अंतिम करण्यावरही चर्चा झाली. रो-रो फेरी सेवेमुळे नागरिकांचा प्रवास खूप सोपा आणि जलद होईल. या जलप्रवासामुळे मोठ्या प्रमाणात वेळेची बचत होईल. सागरी मार्गाने कारची वाहतूक देखिल होईल. परिणामी रस्ते वाहतूकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल आणि रस्ते वाहतूक सुरळीत होईल, असा विश्वास आमदार क्षितीज ठाकूर यांनी व्यक्त केला.
या बैठकीत प्रशासकीय अधिकारी प्रदीप बधिये, अभियंते कल्याण छोरिया, सुधीर डेरे आणि चव्हाण यांचा समावेश होता. तर बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील, माजी महापौर नारायण मानकर, प्रवीण शेट्टी, रुषित दवे आणि प्रकाश वनमाळी बैठकीला हजर होते.
आचोळे गाव आणि एव्हरशाईनजवळ लवकरच अत्याधुनिक मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रगत यंत्रसामग्रीने सुसज्ज अशा सुविधा असतील. नागरिकांच्या विविध वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी विस्तृत उपचार पुरवले जातील अशा पध्दतीने रुग्णालय डिझाइन केलेले आहे, अशी माहिती आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिली.