ठामपाच्या गळक्या शाळांची व्यथा
ठाणे: मागील वर्षी बांधण्यात आलेल्या येऊर येथील शाळेसह ठाणे महापालिकेच्या १५ गळक्या शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. त्याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने शिक्षणाबाबत प्रशासन गंभीर नसल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.
ठाणे महापालिकेच्या ८० शाळांमधून सुमारे ३० ते ३५ह जार गरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. या विध्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, शाळा सुस्थितीत असाव्यात याकरिता दरवर्षी महापालिका प्रशासन करोडो रुपये खर्च करत असते. विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पुस्तके आणि इतर शालेय साहित्य दिले जाते. असे असले तरी शहरातील तसेच ग्रामीण भागातील १५ शाळा या पावसाळ्यात गळत होत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे शिकवले जात नव्हते तसेच शाळा गळत असल्याने विद्यार्थ्यांना छत्र्या घेऊन आणि रेनकोट घालून बसावे लागल्याचे काही पालकांनी ‘ठाणेवैभव’ला सांगितले.
गळतीमुळे शॉर्ट सर्किट होण्याची भीती देखिल काही पालकांनी व्यक्त केली. पावसाळा सुरु होण्यापूर्वी शाळांची तपासणी करून दुरुस्ती केली असती तर पावसाळ्यात शाळांवर ही परिस्थिती ओढावली नसती, असे देखिल काही पालकांनी सांगितले.
येऊर येथील शाळेचे लोकार्पण करून एकच वर्ष झाले आहे, ती शाळा देखील गळत आहे. ही शाळा बांधताना किती निकृष्ट दर्जाचे काम केले असावे याचा अंदाज येतो. त्यामुळे मागील तीन ते चार वर्षांत बांधण्यात आलेल्या शाळा इमारतींचे महापालिका आयुक्तांनी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.