ठाणे: उद्या 15 ऑगस्ट रोजी ठाण्यामध्ये ग्रॅण्डमास्टर पद्मविभूषण विश्वनाथन आनंद येत असून एकाच वेळी २२ बुद्धीबळपटूंना त्याच्याशी मुकाबला करण्याची संधी मिळणार आहे.
रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊन आणि अपस्टेप अॅकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या एक दिवसीय उपक्रमात 500 जणांसाठी फिडे रॅपिड रेटिंग स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. टिपटॉप प्लाझा येथे सकाळी साडेनऊ वाजता स्पर्धेचे उद्घाटन रोटरीचे प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. याच दिवशी दुपारी २ वाजता विश्वनाथन विरुद्ध २२ हा प्रदर्शनीय सामना कोरम मॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
सुमारे अडीच लाख रुपयांची बक्षिसे आणि 80 मानचिन्हे देऊन फिडे रॅपिड रेटिंग स्पर्धेच्या विजयी स्पर्धकांना गौरविण्यात येणार आहे. रोटरीच्या या उपक्रमासाठी ग्रँड मास्टर विष्णू प्रसन्न, अभिजीत कुंटे, दीपेन चक्रवर्ती, इंटरनॅशनल मास्टर रत्नकिरण, शरद टिळक, विक्रमादित्य कुलकर्णी, कुशाग्र कृष्णेतर, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष गिरीश चितळे आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कनव्हेनर मिलिंद बल्लाळ, अध्यक्ष मनन वोरा आणि अपस्टेप अकॅडमीचे सलिल घाटे यांनी कळविले आहे.
लाइटनिंग किड ते पद्मविभूषण
विश्वनाथन आनंद हे भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहेत. १९८८ मध्ये ते भारताचे पहिले ग्रँडमास्टर बनले. ते पाचवेळा विश्वविजेता ठरले. लहानपणी खेळण्याच्या वेगवान गतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या, आनंद यांनी 1980च्या सुरुवातीच्या कारकिर्दीत “लाइटनिंग किड” हे नाव कमावले. आनंद हे 1991-92 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे पहिले प्राप्तकर्ता होते. हा भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे. 2007 मध्ये, त्यांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मविभूषण प्रदान करण्यात आला, ज्यामुळे तो पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले खेळाडू बनले.