पाणीपुरवठा आणि परिवहन विभाग कायमच ठाणे महापालिकेसाठी डोकेदुखीचे विषय बनले आहेत. उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ न बसल्यामुळे परिवहन सेवा डबघाईस आली आहे. ती बंद करण्याचा वा बेस्टसारख्या संस्थेस चालवायला देण्याची चर्चा अधुनमधून होत असते. बेस्टवाले त्यास राजी नसले तरी! परंतु पाण्याच्या बाबतीत अशी चर्चाही होऊ शकत नाही, कारण परिवहनपेक्षा पाणी अधिक जीवनावश्यक बाबीत मोडते. दुसरे म्हणजे परिवहन उपक्रमाला अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यावर दामदुप्पट पैसे मोजण्याची नागरीकांना सवयही आहे. उद्या पाण्याला पर्याय दहा रुपयांची बिसलेरीची बाटली एवढाच रहातो. त्यात पुन्हा परिवहनपेक्षा पाण्याच्या संदर्भात जनतेच्या संवेदना अधिक जोडल्या गेल्या आहेत. पाणी हे अत्यावश्यक आहे. ते नळाद्वारे घरात येते, भले दोन-चार तास, परंतु बसला ताटकळत उभे रहाण्यासारखा त्रास त्यामागे नसतो. अशा प्रकारे विनासायास पाणी घरात येत असताना नागरीकांनी पाणीपट्टी थकित ठेवणे कितपत उचित ठरते?
देशाला सध्या ज्या ‘फुकट-संस्कृतीने’ ग्रासले आहे तोच प्रकार पाण्याच्या बाबतीत झाला आहे. वीज, एक वेळचे भरपेट जेवण वगैरे मोफत देणारी राज्ये डबघाईला येऊ लागली आहेत. परंतु सवंग लोकप्रियतेसाठी आणि निवडणुकांवर डोळा ठेऊन हे केले जात असते. त्यात मानवतावाद वगैरे उदात्त विचार अजिबात नसतो. सरकारी तिजोरी लुटण्याचा हा एक प्रकारचा राजकीय डाव असतो. परंतु जे प्रामाणिकपणे कर भरतात, त्यांना ही सपशेल फसवणूक वाटत असते. पाण्याच्या बाबतीत असो वा बेकायदा बांधकामांना अभय देण्याचा विषय असो, समाजात कायदेशीर आणि बेकायदेशीर अशी सरळसरळ फूट पडली आहे. त्याला गरीब-श्रीमंत असा रंग देऊन जनतेची दिशाभूल केली जात आहे. परंतु प्रत्यक्षात प्रशासनाला राजकीय इच्छाशक्तीची जोड मिळाली असती तर पाणीपट्टीची वसुली होण्यात मदत झाली असती. पाण्यासारखी सुविधा कितीही थकबाकी झाली तरी बंद होत नसते, ही हमीच देयके थकवणाऱ्यांना निर्धास्त ठेवत असते. दुसरीकडे परिवहनची बस मिळाली नाही आणि जनता घरीच बसू लागली तर त्यांना नोकरीवर पाणीच सोडावे लागेल! हे परवडणारे नसते त्यामुळे झक्कत दुसरा पर्याय शोधून नागरीक मार्ग काढत असतात.
आमच्या मते पाणी आणि परिवहन या दोन सुविधांबाबत प्रशासन आणि राज्यकर्ते यांनी जनतेला भान देण्याची गरज आहे. हे भान दिले गेले तरच लोकांमध्ये कर्तव्यभावना उत्पन्न होईल. अन्यथा थकबाकीची रक्कम वाढतच जाईल आणि प्रत्येक निवडणुकीत ती माफ करण्याची टूम प्रत्येक पक्ष काढत राहील. त्यामुळे शहराचे वाटोळे होत राहील.