ठाणे : कामगार आयुक्त कार्यालयाने महापालिकेतून फेरीवाल्यांची नोंदणी केलेल्या अधिकृत फेरीवाल्यांची माहिती घेतली असून आठवडाभरात फेरीवाला समितीची निवडणूक घेतली जाणार आहे. त्यामुळे ठाण्यात फेरीवाला धोरण लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.
अनेक वर्षे रखडलेले फेरीवाला धोरण आता अंतिम टप्प्यात असल्याचा दावा वारंवार महापालिकेकडून केला जात होता. मे महिन्यात महापालिकेने १३६७ फेरीवाल्यांची अंतिम यादी तयार केली होती. त्यानंतर आता फेरीवाल्यांना जागा देणे, रजिस्ट्रेशन चार्जेस, फेरीवाला कमिटीची निवडणूक घेतली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले होते. परंतु जे फेरीवाले अंतिम झाले आहेत, तेच आता कमिटीत कोण कोण जाणार आहेत ते ठरविणार आहेत. त्यानुसार कामगार आयुक्तांकडे निवडणुक घेण्यासाठी महापालिकेने पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार कामगार आयुक्त कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेत नोंदणीकृत फेरीवाल्यांची माहिती घेतली आहे.
सध्या फेरीवाल्यांची ३० जणांची कमिटी आहे. आता नव्याने होणाऱ्या कमिटीत २० जणांचा समावेश असणार आहे. यात फेरीवाल्यांचे आठ प्रतिनिधी, पाच शासकीय प्रतिनिधी आणि उर्वरीत हे सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी असणार आहेत.
निवडणुक प्रक्रिया पार पडल्यानंतर या कमिटीच्या माध्यमातून फेरीवाल्यांच्या जागा निश्चित केल्या जाणार आहेत. त्या-त्या प्रभाग समितीनुसार यासाठी काही रस्ते शोधण्यात आले आहेत. त्याठिकाणी फेरीवाल्यांना आपला हक्काचा व्यवसाय करता येणार आहे.