गवतासह शेकडो नवजात झाडे उद्ध्वस्त
शहापूर:.शहापूर तालुक्यातील परिमंडळ धसई वनक्षेत्रातील शेलवली (खं) संरक्षित वनात वनविभाग आणि इतर संस्था कंपन्या यांच्या संयुक्त माध्यमातून ५५ हेक्टर वनजमिनीवर वृक्ष लागवड करण्यात आली आहे. या संपूर्ण क्षेत्रा तणनाशकाची अंदाधुंद फवारणी करण्यात आल्याने येथील गवतासह शेकडो नवजात झाडे उद्ध्वस्त झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
शहापूर तालुक्यातील धसई परिमंडळ क्षेत्रात असलेल्या शेलवली (खं) येथील कंपार्टमेंट नंबर ८६५ व सर्व्हे नंबर २२३ मधील ५५ हेक्टर वन जमिनीवर विविध जातींच्या झाडांची लागवड शहापूर उपवनसंरक्षक विभाग, मे.दिपक नायट्राईड लिमिटेड कंपनी, तळोजा आणि मे. ए.के.रुरल डेव्हलपेंट ट्रस्ट, ठाणे यांच्या त्रिपक्षीय करारान्वये करण्यात आली आहे. या झाडांभोवती गवत येऊ नये म्हणून अतिशय शक्तिशाली तणनाशक औषधाचा वापर करून संपूर्ण क्षेत्रच नापीक करण्यात आले आहे. धसई परिमंडळ कार्यालय आणि संबंधित क्षेत्र अगदी हाकेच्या अंतरावर असतांना आणि उपवनसंरक्षक, वनपरिक्षेत्रपाल आणि वनपाल यांना पूर्वकल्पना असतांना देखिल हा अमानुष प्रकार सुरु असल्याने त्यांनीच या तणनाशक फवारणीला मूक संमती दिली आहे की काय असा संशय व्यक्त केला जातो.
२०२१ आणि २०२२ पासून या क्षेत्रात तणनाशकाचा वापर केल्याने संपूर्ण गवत मातीमोल झाले आहेच शिवाय येथे लागवड केलेली असंख्य झाडे उद्ध्वस्त झाली आहेत. हा संतापजनक प्रकार जनावरे चारण्यासाठी जाणारे पशुपालक ज्ञानेश्वर बसवंत आणि अशोक बसवंत यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणली. तसेच ही बाब गंभीर असून तणनाशक फवारणी करु नका असे सांगितले. यावर आम्हाला वरिष्ठांचे आदेश असल्याचे पशुपालकांना सांगण्यात आले. या गंभीर प्रकाराबाबत प्रभारी वनक्षेत्रपाल यांना वारंवार फोन केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
तणनाशकाचे दूरगामी दुष्परिणाम
तणनाशक झाडांच्या पानातील हरितद्रव्याच्या उत्पादनात बाधा आणून पेशींचे आवरण खराब करतात. तसेच जमिनीचे आरोग्य धोक्यात येऊन तिचा पोत नष्ट होतो. तणनाशक फवारल्यामुळे जरी कमी खर्चात, योग्य वेळेतनआणि कमी श्रमात तणनियंत्रण करता येणे शक्य असले तरी यामुळे जमिनीवर त्याचे दूरगामी परिणाम घडून येतात. तणनाशकाचा बेसुमार वापर जमिनीला नापीक बनवतो. तणनाशकांचा अंदाधुंद वापर केल्याने जमिनीतील क्षारांचे प्रमाण लक्षणीय वाढते. त्यामुळे आगामी काळात जमीन नापीक होण्याचा धोका कायम असतो.
वनजमीनीवर तणनाशक औषध फवारणी करणे घातक असून तसे करण्यास वनविभाग कधीच परवानगी देत नाही. झालेल्या घटनेची दखल घेऊन तत्काळ चौकशी करण्यात येईल, असे शहापूर उपवनसंरक्षक सचिन रेपाळ यांनी स्पष्ट केले.
१० ग्रॅम मातीमध्ये १० कोटी जीवाणू असतात. या तणनाशक फवारणीमुळे हे जीवाणू संपुष्टात येऊन जमिनीचा पोत नष्ट होतो आणि तो पोत सुधारण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी जातो. ही एवढी गंभीर बाब आहे की, हे फवारणी केलेले पाणी नदी-नाल्यांमध्ये जाते. पर्यायाने पिण्याच्या पाण्यात हे पाणी गेल्याने कर्करोगासारख्या आजारांचा धोका वाढतो, अशी माहिती कृषी तज्ञ प्रा.प्रकाश भांगरथ यांनी दिली.