वर्सोवा पूल खड्ड्यात घालणारा ठेकेदार काळ्या यादीत

भाईंदर: तब्बल २४७ कोटी रुपये खर्च करून बांधलेला वर्सोवा पूल अवघ्या तीनच महिन्यांत खड्ड्यात गेला. याप्रकरणी खा. राजेंद्र गावित यांनी गंभीर दखल घेऊन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार केली. श्री. गडकरी यांनी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मूग गिळून गप्प बसणाऱ्या अधिकाऱ्यांचीही गडकरी यांनी चांगलीच हजेरी घेतली आहे.

मुंबई तसेच ठाण्याहून पालघर आणि गुजरातला जाण्यासाठी घोडबंदर येथील वर्सोवा खाडी पार करावी लागते. या खाडीवर जुन्या वर्सोवा पुलाशेजारी नवीन वर्सोवा पूल तयार करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे सुरू करण्यात आले होते. या पुलावर चार मार्गिका आहेत. जानेवारी २०१८ मध्ये या पुलाच्या कामाला सुरुवात झाली होती. त्यानुसार २७ मार्च २०२३ रोजी या पुलावरील एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली होती. जवळपास २.२५ किमी लांबीच्या या प्रकल्पाची किंमत २४७ कोटी इतकी आहे. हे काम संयुक्तरीत्या व्ही. एम.सी. कंपनी आणि एन. जी. लि. कंपनीच्या माध्यमातून विजय मिस्त्री यांनी घेतले होते.

नवीन वर्सोवा पूल सुरू झाल्यापासून या मार्गिकेचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता. प्रवाशांची वाहतूककोंडीतून सुटका झाली होती. मात्र जुलै महिन्यात झालेल्या धुवांधार पावसाने या पुलाच्या कामाची अक्षरश: पोलखोलच झाली असून संपूर्ण पुलावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे रोजच येथे वाहतूककोंडी होत आहे. पुलाच्या दुर्दशेविरोधात प्रवाशांनी संताप व्यक्त करत सरकारला खडेबोल सुनावले होते.

खा. राजेंद्र गावित यांनी सदर प्रकरणी वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन तक्रार केली. खा. गावित यांच्या तक्रारीची दखल घेऊन या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले आहेत. तसेच यापुढे या कंत्राटदारांना कोणत्याही ठिकाणी काम देऊ नका, असे अधिकाऱ्यांनाही बजावले आहे.