ठाणे: हल्ली सायबर गुन्ह्याचे बळी अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून तरुण आणि ज्येष्ठांपर्यंत सारेच पडण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. याबाबत काहीवेळा वाच्यता करणे लज्जास्पद वाटते, त्यामुळे हे गुन्हे बऱ्याच वेळा दडपले जातात. अशावेळी सायबर वेलनेस एक्सपर्ट्स यांची हेल्पलाईन सर्वसामान्यांना आधार ठरू पाहत आहे.
बर्याच सायबर गुन्ह्यांमध्ये एखादा बळी पडत असतो किंवा पडणार असतो, पण तेंव्हा हे कोणाशीही शेअर करताना आपल्याला संकोच वाटत असतो. अगदी जवळच्या माणसाला सांगणं पण नको वाटू शकते, रिपोर्ट करणे लाजिरवाणे वाटू शकते किंवा नेमके काय करायला पाहिजे, ते नीट लक्षात येत नाही. मग अशा वेळी काय करायचं? तर सायबर वेलनेस हेल्पलाईन 7353107353 वर कॉल करायचा किंवा याच व्हॉट्सॲप क्रमांकावर मेसेज करायचा, अगदी बिनदिक्कतपणे! ही मोफत सायबर वेलनेस हेल्पलाईन पूर्ण भारतभर, सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत उपलब्ध असेल.
सायबर सुरक्षा क्षेत्रात गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या आणि आत्तापर्यंत लाखो मुलांना व महिलांना सायबर सुरक्षा विषयाचे पद्धतशीर प्रशिक्षण देणाऱ्या रिस्पॉन्सिबल नेटिझम ह्या संस्थेने ही हेल्पलाईन सुरू केली आहे.
इथे फोन केल्यावर पीडितांना कोणीही जज करणार नाही. परिस्थिती हाताळण्यासाठी काय करायला पाहिजे ते सांगून योग्य ती मदत करणार आहेत. जर काउन्सिलिंगची गरज असेल तर तशी व्यवस्था करणार आहेत.
या क्षेत्रातील तज्ज्ञ, कायदा जाणणारी, मानसशास्त्राचा अभ्यास असणारी आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवून, संरक्षण मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करणारे सायबर वेलनेस एक्सपर्ट्स ह्यामागे आहेत. यावर सारे १०० टक्के विश्वास ठेवू शकतात.
ऑनलाईन आर्थिक फसवणूक, सोशल मीडियावर होणार छळ किंवा ऑनलाईन गेम्सचा अतिरेकी वापर, फेक प्रोफाईल बनवणे, फोटो मॉर्फिंग, हॅकींग, ऑनलाईन पाठलाग (Stalking), खास करून मुलांबरोबर होणाऱ्या सायबर बुलींग (Bullying) यासारखे ऑनलाईन गुन्हे, सायबर विकार आणि त्यातून उद्भवणाऱ्या वर्तणूक विषयक तसेच मानसिक समस्या अशा सर्व प्रकारांसाठी आपल्याला आमच्या सायबर वेलनेस एक्सपर्ट्सकडून मदत मिळणार आहे.