विरोधी पक्ष नेतेपदी विजय वडेट्टीवार

मुंबई: अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील समीकरणे बदलली. उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार विराजमान झाले. त्यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेता कोण? असा प्रश्न विचारला जात होता. अखेर विरोधी पक्षनेतेपदी ल विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर विधानसभेत काँग्रेसचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून कुणाला विरोधी पक्षनेतेपद दिलं जाणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादीकडून विजय वडेट्टीवार आणि संग्राम थोपटे यांचं नाव चर्चेत होतं. मात्र, अखेर विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी विरोधी पक्ष नेतेपदी विजय वडेट्टीवारांच्या नावाची घोषणा केल्यानंतर सभागृहाकडून वडेट्टीवार यांचे अभिनंदन करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: वडेट्टीवार यांना विरोधी पक्ष नेते पदाच्या खुर्चीवर आसनस्थ केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडेट्टीवार यांचे अभिनंदन केले.

विजय वडेट्टीवारांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला मारला आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, विजय वडेट्टीवार वर्क फ्रॉम होम करणारे नेते नाहीत. ते रस्त्यावर उतरून काम करणारे नेते आहेत. रस्त्यावर उतरून काम करायला हिंमत लागते. आम्ही तेच केले. संकट आलं तर लपायचे नसते, सामोरे जायचे असते.

राज्याला सक्षम विरोधी पक्षनेते मिळाले-फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याला सक्षम विरोधी पक्षनेते मिळाले आहेत. शासन चुकलं की त्यांना त्यांची चूक दाखवून देणं हे विरोधी पक्ष नेत्याच काम असतं.या महत्त्वाच्या पदावर दुसऱ्यांदा वडेट्टीवार बसले आहेत. त्या पदाचा मान सन्मान ते वाढवतील. विजय वडे्टीवार यांना माईकची गरज नाही.