श्रावणात भाज्या शंभरी पार

नवी मुंबई: श्रावणातील अधिक मास, त्यात मागणीपेक्षा पुरवठा कमी यामुळे बहुतांश भाज्यांनी शंभरी पार केली आहे. शाकाहार महाग झाल्याने गृहिणींचे किचन बजेटही पुरते कोलमडले आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. ज्या भाज्या येत आहेत त्या पावसात भिजत असल्याने त्या खराब देखील होत आहेत. परिणामी मागणीप्रमाणे भाज्या उपलब्ध होत नसल्याने भाज्यांचे दर चढेच आहेत.

बाजारात मागील एक ते दीड महिन्यांपासून टोमॅटो १०० च्या खाली उतरण्याचे नाव घेत नाही. इतर भाज्यांच्या किंमतीत देखील किलोमागे २० ते ३० रुपयांची वाढ झाली असून बहुतांश भाज्यांचे दर शंभरीपार गेले आहेत. सध्या श्रावण अधिक मास सुरू आहे. पुढील दिवसात प्रत्यक्षात श्रावण महिना सुरू होईल, त्यानंतर गणेशोत्सव. या दिवसांत मोठ्या प्रमाणात शाकाहार केला जातो. त्यामुळे सध्याच्या घडीला वाढलेले भाज्यांचे दर ऐन उत्सव काळात आणखी महागणार आहेत.

भाज्यांची आवक वाढली नाही तर किमती आणखी वाढणार असल्याचा अंदाज वाशी एपीएमसी भाजीपाला बाजारमधील व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.

रोजच्या जेवणात लागणाऱ्या भाज्यांचे दर सध्या कमालीचे वाढले असल्याने आमचे किचन बजेट पुरते कोलमडले आहे. अजून मुख्य श्रावण महिना आणि गणेशोत्सव सण येणार आहे. त्यामुळे परिस्थिती अशीच राहिली तर खर्च भागवायचा कसा?असा प्रश्न जुई नगर येथील गृहिणी सायली झुजुम यांनी उपस्थित केला आहे.

किरकोळ बाजारात भाज्यांचे दर
वाटाणा: २०० ते २२० रुपये प्रतिकिलो, आले: २०० ते २२० रुपये प्रतिकिलो, टोमॅटो: १६० ते १८० रुपये प्रतिकिलो, फरसबी: ११० ते १२० रुपये प्रतिकिलो, गाजर: १०० ते १२० प्रतिकिलो, तोंडली: १०० ते ११० रुपये प्रतिकिलो, हिरवी मिरची: १०० ते १२० रुपये प्रतिकिलो, ढोबळी मिरची: १०० ते १२० रुपये प्रतिकिलो, गवार: १०० ते ११० रुपये प्रतिकिलो