किन्नरांसाठी कल्याण महामंडळ स्थापन करा

आमदार प्रताप सरनाईक यांची अधिवेशनात लक्ष्यवेधी

ठाणे : तृतीय पंथीयांना समाजात समानतेचा अधिकार देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ’किन्नर कल्याण महामंडळ“ स्थापन करावे, अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

यासंदर्भात त्यांनी पावसाळी अधिवेशनात लक्ष्यवेधी देखील मांडली आहे. या लक्ष्यवेधीच्या माध्यमातून किन्नरांना अनेक सोयी-सुविधा देण्यासंदर्भात अंतर्भाव करण्यात आला आहे.

किन्नर समाजाच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी गेल्या अधिवेशनात त्यांच्या मागण्या सरकारकडे मांडल्या होत्या. किन्नर लोकांना समाजात बहिष्कृत केले जाते किंवा वाईट वागणूक मिळते, किन्नरांना रोजगार नसल्याने ते भीक मागताना ट्रॅफिक सिग्नलवर किंवा इतर ठिकाणी दिसतात. महाराष्ट्र हा प्रगत राज्य तर आहेच पण देशाला दिशा दाखवणारा आहे. त्यामुळे तृतीय पंथीयांना समाजात समानतेचा अधिकार देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ’किन्नर कल्याण महामंडळ“ स्थापन करावे, अशी मागणी सरनाईक यांनी सरकारकडे केली आहे.

किन्नरांसाठी स्वतंत्र शौचालये नसल्याने त्यांची प्रचंड कुचंबणा होते. त्यामुळे अशी शौचालये तातडीने बांधणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण, पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्र सेल, रेल्वेगाडीत महिलांसाठी असते तशी किन्नरांसाठीच स्वतंत्र बोगी, सरकारी अर्जामध्ये स्त्री, पुरूष याप्रमाणेच किन्नर असा तिसरा कॉलम असावा, यासह त्यांच्या रोजगार, घर, शिक्षण याबाबत अशा किन्नर संघटनेच्या विविध मागण्या आहेत.