ठाणे जिल्ह्यातील शाळांना आजही सुट्टी

मुंबई: गेले दोन दिवस ठाणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या शुक्रवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार राज्यात मुसळधार पाऊस पडत असून ठाणे, पालघर, मुंबईसह उर्वरित कोकणात पावसाने थैमान घातले आहे. ठाणे शहरासह जिल्ह्यात सुरक्षितता म्हणून गुरुवारी सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर आणि पावसाचा जोर पाहता शुक्रवार २८ जुलै रोजी देखील सर्व शाळा बंद राहतील असे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जाहीर केले आहे.

राज्यात येत्या 48 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून त्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमधील शाळांना गुरूवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आदेश दिले आहेत.

राज्यातील इतर भागातील परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक प्रशासन निर्णय घेणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे. आज मुंबई, ठाणे, कोकण आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे मंगळवारी या ठिकाणच्या शाळा बंद ठेवण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

राज्यातील आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत निर्णय घ्यावा असे निर्देश मुंबई शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत. आपल्या कार्यक्षेत्रातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.