राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला

मुंबई: महाविकास आघाडीच्या काळात राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा मुद्दा गाजला होता. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली यादी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रोखून ठेवली होती. मात्र, आता नियुक्तीची स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवल्याने राज्यपाल नियुक्त आमदार लवकरच नियुक्त केले जाणार आहेत.

पूर्वी शिवसेना आणि भाजपा या दोन पक्षांचे अर्धेअर्धे म्हणजेच सहा-सहा आमदार असणार होते. मात्र, आता राष्ट्रवादी कॉंग्रेसही सत्तेत आल्याने आमदार तीन पक्षाचे असणार आहेत. दरम्यान, या १२ आमदारांच्या नियुक्तीचा फॉर्म्युला ठरल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या वाट्याला सहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तीन आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागा असा फॉर्म्युला ठरला आहे. अधिवेशनानंतर तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर राज्यपालांना यादी पाठवली जाणार आहे, अशीही माहिती समोर आली आहे.

राज्यात ठाकरे यांचे सरकार असताना राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा मुद्दा चांगलाच गाजला होता. माजी राज्यपाल भगत सिंह कोशारी यांनी ठाकरे सरकारने दिलेली नावे मंजूर केली नव्हती. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीसंदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयात गेली. अखेर सर्वोच्च न्यायालयाने हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आता या आमदारांची नियुक्ती होणार आहे.