ठाणे: गुरुवारी संध्याकाळी ठाणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन कार्यालयाचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंबईसह ठाण्याला मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे अनेक राजकीय नेत्यांनी आपले कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. त्यामुळे ठाण्यातील कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ठाण्यात नवीन कार्यालयाचे उद्घाटन होणार होते. मात्र, हवामान खात्याने रेड अलर्ट दिल्याने सरकारने नागरिकांना आवाहन केले असताना याचे पालन आपणही करणे आवश्यक असल्याचे अजित पवार म्हणाले होते. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. दिवसभर ठाणे शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून नागरिकांची आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. पावसाचा अंदाज घेऊन पुढच्या वेळेस निश्चित ठाणेकरांच्या भेटीला येण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळत असलेल्या पाठींब्यासाठी श्री.पवार यांनी ठाणेकरांचे आभार मानले असल्याचे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे आणि सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी यावेळी सांगितले.