ठाणे : शहरातील ओवळा भागात असलेल्या बंधार्याच्या पाण्यात १९ वर्षीय मुलगा बुडाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.
ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि ठाणे अग्निशमन विभागाकडून या मुलाचे शोधकार्य सुरु होते. अखेर गुरुवारी या मुलाचा मृतदेह सापडल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.
चिराग जोशी (१९) असे या मुलाचे नाव असून तो कळवा येथील पारसिक नगर भागात राहत होता. चिराग हा बुधवारी भावासह आणि भावाच्या दोन-तीन मित्रांसह बंदार्यावर फिरायला गेला होता. चिराग ला पोहोता येत नसल्यामुळे तो एका बाजूला उभा होता. बाकीचे जण बंधार्यावर खेळण्यात मग्न होते. काही काळानंतर चिरागला तहान लागली म्हणून त्याने भावाला पाणी आणण्यासाठी पाठवले. भाऊ पाणी घेऊन परत येईपर्यंत चिराग दिसेनासा झाला. चिरागचा भाऊ आणि त्याचे मित्र चिरागचा शोध घेत होते. त्या मित्रांनी चिराग पाण्यात पडला असावा असा अंदाज चिरागच्या भावासमोर व्यक्त केला. दोन-तीन तास होऊन गेले तरी चिरागचा शोध काही लागेना म्हणून त्याचे भाऊ आणि मित्रांनी कासारवडवली पोलिस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांना घडलेल्या घटनेबाबत सांगितले. ही माहिती मिळताच कासारवडवली पोलीस ठाण्याचे कर्मचारी, ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि ठाणे अग्निशमन दलाच्या जवान घटनास्थळी पोहोचले आणि चिरागचे शोधकार्य सुरु केले. बुधवारी रात्री १२.३० वाजेपर्यंत हे शोधकार्य सुरु होते. परंतु, रात्रीच्या अंधारात शोधकार्य करणे शक्य होत नव्हते म्हणून कार्य थांबविण्यात आले होते. या ठिकाणी गुरुवारी सकाळी ८.३० च्या सुमारास शोधकार्याची मोहीम हाती घेण्यात आले. सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर चिरागचा मृतदेह बंधाऱ्याच्या पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. चिरागचा मृतदेह कासारवडवली पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. परंतु, चिरागचा मृत्यू हा संशयास्पद असल्याचा अंदाज हा व्यक्त केला जात आहे.