१६ कुटुंबे स्थलांतरीत
भाईंदर: नालासोपारा येथील हनुमान नगरमधील चार मजल्याची जैनम इमारत एका बाजूला झुकल्याने असुरक्षित घोषित करण्यात आली होती. तथापि, रहिवाशांना स्थलांतरित केले नव्हते. मात्र मंगळवारी रात्री महापालिका अधिकाऱ्यांनी इमारत दुर्घटना होऊ नये यासाठी इमारतीतील १६ कुटुंबियांना स्थलांतरित केले असून त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आल्याचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले.
वसई-विरार महानगरपालिकेने मंगळवारी संध्याकाळी इमारतीतील एक स्तंभ कोसळल्याचा संशय आल्याने जैनम इमारतीतील सोळा कुटुंबांना बाहेर काढले. अधिकार्यांच्या सांगण्यानुसार
नालासोपारा येथील हनुमान नगर येथे असलेली चार मजली जैनम इमारत असुरक्षित असल्याचे घोषित करण्यात आले होते. तथापि, रहिवाशांनी ती रिकामी केली नव्हती. व्हीव्हीएमसीचे उपायुक्त किशोर गवस यांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी इमारतीचा एक स्तंभ कोसळला. इमारत आधीच खराब झाली होती आणि अतिशय वाईट स्थितीत होती. जैनम इमारतीत राहणाऱ्या सर्व सोळा कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. इमारतीत ३४ सदनिका असून इमारत आम्ही जमिनदोस्त करणार आहोत. म्हणून जवळच्या जलाराम कुंज इमारतीतील कुटुंबांनाही बाहेर काढण्यात आले आहे. स्थलांतरित कुटुंबांना सर्व मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. एनडीआरएफचे एक पथक, महापालिका आणि स्थानिक पोलिस घटनास्थळी उपस्थित आहेत. जवळच्या इतर इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट लवकरच केले जाईल, असेही सांगितले..
परिसरात मुसळधार पाऊस पडत असतानाही बुधवारी सकाळपासून आयुक्त अनिलकुमार पवार, शहर अभियंता राजेंद्र लाड, उपायुक्त किशोर गवस, सहायक आयुक्त नीता कोरे यांच्या उपस्थितीत इमारत जमिनदोस्त करण्यास सुरुवात झाली.