ठाण्यात पावसाने गाठला दोन हजार मिमीचा टप्पा

ठाणे: मागिल २४ तास पडणाऱ्या पावसाने दोन हजार मिमी पावसाचा टप्पा पार केला असून मागील वर्षापेक्षा ४० टक्के जास्त पाऊस शहरात पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले तर विविध भागात पाणी तुंबल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता.

ठाणे शहरात आज कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने २००५साली पडलेल्या पावसाची आठवण करून दिली. सकाळपासूनच शहरात पाऊस पडत होता, त्यामुळे शहरातील सखल भाग असलेल्या वंदना सिनेमा भागात पाणी साचले होते, परंतु ते पाणी पम्प लावून उपसले जात असल्याने त्याचा जास्त त्रास झाला नाही. सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत शहरात ५०.२८ मिमी पावसाची नोंद झाली होती. आत्तापर्यंत शहरात २०३९.८९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी १४४३.९७ मिमी इतका पाऊस पडला होता. यावर्षी तब्बल ४०टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्याचा वाहतुकीवर देखील परिणाम झाला होता. रस्त्यावर खड्डे पडले असल्याने मुंबई-नाशिक आणि घोडबंदर मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. या पावसाचा लोकल सेवेवर परिणाम मात्र झाला नाही.