नवरंग पक्ष्याचा ठाणे जिल्ह्यात चार महिने मुक्काम
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील नदी, खाडी किनारे आणि जंगल परिसर विपूल असल्यामुळे फ्लेमिंगोसह विविध पक्षांची रेलचेल असतेच शिवाय पावसाळ्याआधी आणि पाऊस सुरु झाल्यावर देश-विदेशांमधील पक्ष्यांचे आगमन झाले आहे. यापैकी एक असणारा नवरंग (इंडियन पिट्टा ) पक्ष्याची ‘व्हीटयू’ शीळ कानी पडत आहे.
ठाण्यात विणीच्या हंगामात हिवाळ्यात विविध छटा असलेल्या परदेशी ‘पक्षी’ पाहुण्यांची रेलचेल असते. तर तांबडा, पिवळा, हिरवा, निळा अशा विविध रंगांच्या छटा असलेला आणि मन मोहून टाकणारा पक्षी दक्षिण भारतातून येतो. दाट झाडी, जंगलांमध्ये फिरताना याची शिळ कानी पडल्यावर ‘नवरंग’चे हमखास दर्शन पक्षी प्रेमींना घडते.
पावसाने ठाणे जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. निसर्गाच्या कुशीत विसावा घेण्यासाठी देश-परदेशातून स्थलांतरित पक्षांचेही आगमन झाले. पाऊस सुरु होण्याच्या काही दिवसांपूर्वी आपल्या सर्वांचा आवडत्या पोपटाने अन्यत्र स्थलांतर केले होते. चातक, पावशा, तिबोटी खंड्या यांच्यासह ‘नवरंग’ ने आपले पंख आकाशात पसरवले आहेत. साळुंकीच्या आकाराचा हा पक्षी मनमोहक दिसतो.
नऊ रंगांचा वर्षाव निसर्गाने या पक्षाला केल्यामुळे त्याला ‘नवरंग’ या नावाने ओळखले जाते. भगवा, पिवळा, हिरवा, निळा, काळा, पांढरा, पोपटी, किरमिजी या नऊ रंगाची उधळण या पक्षाच्या पिसावर असते. दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आदी भागातून विणीच्या हंगामात हे ‘नवरंग’ उत्तरेकडे झेपावत असतात, अशी माहिती पक्षी अभ्यासक हिमांशू टेंभकर यांनी दिली.
जंगलात भटकंती करताना ‘व्हीट टयू’ असा आवाज ऐकू आला की आसपासच्या भागात नवरंग असल्याचे समजावे. सकाळी आणि सायंकाळी पक्ष्यांचा किलबिलाट अधिक असतो. झाडी- झुडपात राहणे पसंत करणा-या पक्ष्याचा जून ते ऑगस्ट महिना विणीचा हंगाम असतो. पक्षातील नर व मादी दिसण्यात सारखेच असतात. गवत, झाडाची मुळं, काड्यांपासून बनविलेल्या घरट्यात पक्ष्याची मादी चार ते सहा अंडी देते. विविध प्रकारचे किटक हे त्याचे मूळ खाद्य आहे, असे पर्यावरण-पक्षी अभ्यासक माधव आठवले म्हणाले.
बारवी धारण परिसरात झाडी झुडपे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे अनेक पक्ष्यांचा निवारा हमखास असतोच. पावसाळ्यात लांबचा प्रवास करून येणारे तिबोटी खंड्या, कोकिळ कुळातला पावश्या, चातक, भारतीय कक्कू आदी पक्ष्यांचा दिवसभर सतत किलबिलाट असतो. तो ऐकताना प्रत्येकाचे मन मुग्ध होते, असेही आठवले यांनी सांगितले.
दक्षिण भारतातून येणारा नवरंग पक्षी पश्चिम घाट, महाराष्ट्र, मध्य भारत परिसरात याच काळात स्थलांतर करतो. मे ते सप्टेंबर या दिवसात पाहुणचार करून नंतर मायदेशी प्रयाण करतो. मुख्यत: दाट जंगलांतला हा पक्षी शहरात म्हणजे ठाणे, मुंबईच्या दाट झाडीच्या पट्ट्यात हमखास दिसून येतो, अशी माहिती टेंभकर यांनी दिली.