शहापूर: शहापूर तालुक्यात पावसाळी पर्यटनासाठी हजारो पर्यटक येथील निसर्ग संपदेचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. मात्र या दरम्यान होणारे अपघात तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यामुळे जिल्हा प्रशासनाने पर्यटनस्थळे 30 ऑगस्टपर्यंत बंद केल्याने स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तालुक्यात मान्सून कालावधीमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक धबधबे, तलाव तसेच धरणांच्या ठिकाणी येत असतात. त्या ठिकाणी जीवितहानी होण्याच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून प्रतिबंधात्मक आदेश लागू करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.
शहापूर तालुक्यातील भातसा धरणस्थळ, कुंडन, दहीगाव, माहुली किल्ल्याचा पायथा, चेरवली, अशोका धबधबा, खराडे, आजापर्वत (डोळखांब), सापगांव नदी किनारा, कळंबे नदी किनारा, कसारा येथील सर्व धबधबे, कसारा घाट ही पर्यटनस्थळे पावसाळ्यात पर्यटकांनी फुल्ल होतात.
पावसाळ्यामध्ये नदी, नाले, तलाव व धबधबे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. मात्र काही अतिउत्साही पर्यटक मद्यपान करुन मद्यधुंद अवस्थेत खोल पाण्यात उतरणे, उंच भागावर जाऊन सेल्फी काढणे, सुसाट वेगाने गाडी चालवणे आणि नको तिथे ओव्हर टेक करणे, सार्वजनिक ठिकाणी दारूच्या बाटल्या टाकणे, प्लास्टिक ग्लास व मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम लावून ध्वनी प्रदूषण करणे व अश्लील हावभाव करणे,महिलांशी असभ्य वर्तन करणे, मुलींची छेड काढणे, टिंगलटवाळी करणे अशा अनेक विकृत घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन पोलीस प्रशासनावर कामाचा अतिरिक्त ताण येत असतो.
धबधब्यावर येण्यास पर्यटकांना बंदी घातली असल्यामुळे आमच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसात आम्हाला सात ते आठ हजार रुपये उत्पन्न मिळायचे मात्र ते आता बंद झाले. या ठिकाणी पोलीस संरक्षण ठेऊन निर्बंध उठवल्यास तात्पुरता का होईना, आमच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागेल, अशी प्रतिक्रिया अशोका धबधबा, विहिगाव येथील स्थानिक ग्रामस्थ गणेश वाघ यांनी दिली.