ठाणे-भिवंडी प्रवास होणार वेगवान

* शॉर्टकट रस्त्यांचे होणार कॉंक्रीटीकरण
* केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश

भिवंडी : केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या सातत्याच्या प्रयत्नांमुळे मुंबई महापालिकेने काल्हेर ते टेमघर आणि कशेळी ते धामणगावपर्यंतच्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

या दोन्ही रस्त्यांची हजारो भिवंडीकरांना `शॉर्टकट’ म्हणून ओळख असून, या रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणामुळे भिवंडीवासियांचा ठाणे-भिवंडी प्रवास वाहतूक कोंडीविना व वेगाने होणार आहे. या रस्त्याच्या निविदा लवकरच काढल्या जातील, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली.

शहापूर तालुक्यातील भातसा, तानसा, मोडकसागर धरणांमधून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या शहापूर आणि भिवंडी तालुक्यातून टाकण्यात आल्या आहेत. या जलवाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी मुंबई महापालिकेने डांबरी रस्ता तयार केला. या रस्त्यावरून वर्षानुवर्षे स्थानिक नागरिकांबरोबरच विद्यार्थ्यांकडून वापर केला जातो. जुना ठाणे-भिवंडी रस्ता आणि माजिवडा-भिवंडी बायपासवर भीषण वाहतूककोंडी झाल्यावर या पर्यायी मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र, या डांबरी रस्त्याची पावसाळ्यात दुरवस्था होत होती. या रस्त्यावरील मोठ्या प्रमाणावरील खड्ड्यांमुळे नागरिक कोंडीत अडकत होते. या पार्श्वभूमीवर काल्हेर ते टेमघर आणि कशेळी ते धामणगाव रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करावे, अशी आग्रही मागणी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल यांच्याकडे केली होती. तसेच या कामांच्या मंजुरीसाठी सातत्याने प्रयत्न केले होते.

अखेर मुंबई महापालिकेने काल्हेर ते टेमघर आणि कशेळी ते धामणगाव रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाला मंजुरी दिली आहे. या रस्त्यामुळे भिवंडी तालुक्यातील काल्हेर, पुर्णा, वळ, वळपाडा, ताडाळी, टेमघरपर्यंतच्या रहिवाशांचा आणि कशेळी, अंजुरदिवे, माणकोली, ओवळी, पिंपळास, सोनाळे, वालशिंद, येवई ते धामणगावपर्यंतच्या नागरिकांचा प्रवास सुकर होणार आहे.

या रस्त्याचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी निविदा प्रक्रियेला लवकरच सुरू होणार आहे. त्यानंतर या दोन्ही रस्त्याचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणाकडे प्रयत्न केला जाईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली.