दुभाजकामधून घुसणा-या वाहनचालकांना दट्ट्या
ठाणे: ठाणे-नाशिक रस्त्यावरील वडपेपर्यंतच्या रस्त्यावरील कट बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे नाशिकपर्यंत वाहने सुसाट जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे या रस्त्यावरील होणारी वाहतूक कोंडीचा प्रश्नही निकाली निघणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई ते नाशिक महामार्गावर सतत वाहतूक कोंडी होत असल्याबाबत तक्रारींचा ‘पाऊस’ वाहतूक पोलिसांवर पडत होता. त्यामुळे वाहतूक कोंडीची कारणे शोधणे व त्यावर उपाययोजना करण्याच्या उद्देशाने ठाणे शहर पोलीस दलाचे वाहतूक विभाग व ठाणे ग्रामीण पोलीस यांनी संयुक्तपणे पाहणी केली.
त्यानुसार 17 जुलै 23 रोजी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, ठाणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त डॉ.विनयकुमार राठोड यांनी मुंबई आणि नाशिक महामार्गावर खारेगाव टोलनाका ते वडपे नाका या सुमारे २० किलोमीटर महामार्गाची पाहणी केली. या पाहणीत महामार्गाच्या दोन्ही वाहिन्यांमधील रस्ता दुभाजकांवर अनेक ठिकाणी कट आहेत. त्यातून आणि गॅपमधून काही वाहन चालक त्यांची वाहने एका रस्त्यावरून दुस-या रस्त्यावर ने-आण करत असतात. अशा चालकांमुळेच वाहतूक कोंडी होते व हे कट बंद केल्यास कोंडी होणार नाही असे निदर्शनास आले.
त्यामुळे खारेगाव टोलनाका सरवली गाव ते वडपे गाव तालुका भवंडी या ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रात येणा-या महामार्गावरील कट काही ठिकाणी पूर्णत: तर काही ठिकाणी अंशत: बंद करण्याचा निर्णय वरिष्ठ वाहतूक पोलीस अधिका-यांनी घेतला आहे.
ठाणे आयुक्तालय कार्यक्षेत्रातील महामार्गावरील पूर्णत: बंद तर काही कट हाईट बॅरीयर लावून फक्त लहान वाहनांना येण्या-जाण्यास मुभा दिली असून, सरवली येथील कट पूर्णत: बंद करण्यात आला आहे.
ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रात ज्या ठिकाणावरून वाहने दुभाजकावरून ‘यु टर्न’ घेतात, त्याठिकाणचे सर्व कट आणि गॅप पूर्णत: बंद करण्यात आले आहेत. त्यात पाच पेट्रोल पंपांसह अन्य ठिकाणांवर, अनधिकृत दुभाजकांवर सिमेंटचे ब्लॉक व बॅरल / ड्रम लावून पूर्णत: बंद करण्याचा निर्णय पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी गेतला.
महामार्गावरील दोन्ही मार्गांमधील रस्ता दुभाजक हे सहा ते दहा फूट उंचीने कमी असल्यामुळे त्याचा फायदा घेऊन काही वाहन चालक एका वाहिनीवरुन दुस-या वाहिनीवर वाहने क्रॉसिंग करत असतात. त्यामुळे देखील वाहतूक कोंडीत भर पडते
या पाहण्याकरीता श्री. देशमाने आणि श्री. राठोड यांच्यासह ‘एमएसआरडीसी’चे विभागीय अभयंता श्री. डोंगरे, ठाणे शहरच्या वाहतूक विभागांतर्गत कल्याण वाहतूक विभागाचे सहाय्यक आयुक्त मंदार धर्माधिकारी, गणेशपुरी विभागाचे उपअधीक्षक प्रशांत ढोले, ठाणे शहर वाहतूक नारपोली उपविभागाचे श्रीकांत सोंडे, ठाणे शहर वाहतूक कोनगाव उपविभागाचे आप्पासाहेब जानकर, भवंडी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणवीर बयेस आणि पडघा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय साबळे आदी उपस्थित होते.