वाहतूक शाखेच्या परवानगीशिवाय ठाण्यात बसवले दुभाजक
ठाणे : सध्या ठाण्यात दुभाजक बसवण्याचे आणि वाहतूक दिशेत बदल करण्याचे प्रयोग सुरू आहेत. हे बदल कुठे फायदेशीर तर कुठे नागरिकांचे रोष ओढवून घेत आहेत. दरम्यान संबंधित कंत्राटदाराने दुभाजक बसविण्याची परवानगीच वाहतुक पोलिसांकडून घेतली नसल्याची माहिती वाहतुक पोलिसांनी एका दक्ष नागरीकाला माहिती अधिकारात दिली आहे.
शहराच्या विविध भागातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी ठाणे महापालिका आणि वाहतुक पोलिस यांनी पाहणी करुन काही ठिकाणी दुभाजक बसविले आहेत. तसेच काही ठिकाणी नव्याने दुभाजक बसविण्याचे कामही केले जात आहे. गोखले रोड, कापुरबावडी, ब्रम्हांड सिग्नल, विद्यापीठ, आदींसह शहराच्या इतर भागातही अशाच पध्दतीने दुभाजक बसविण्यात आले आहेत. काही ठिकाणी त्याचा चांगला परिणाम दिसत असला तरी आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर त्याचा विपरीत परिणाम झाल्याचे दिसत आहे. गोखले रोडवर तर वाहने थेट दुभाजकांवर चढल्याचे चित्र दिसून आले आहे. तसेच या भागात वाहतुक कोंडीही होतांना दिसत आहे.
चुकीच्या ठिकाणी बसविण्यात येणाऱ्या या दुभाजकांच्या विरोधात ठाण्यातील विविध भागात नागरीकांनी, व्यापाऱ्यांनी, राजकीय मंडळींनी रस्त्यावर उतरुन आंदोलन देखील केले आहे. परंतु शहराची वाहतुक सुरळीत करण्यासाठीच हा प्रयोग केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. याच दुभाजकासंदर्भात दक्ष नागरीक संगम डोंगरे यांनी माहिती अधिकारात वाहतुक पोलिसांकडे माहिती मागिवली होती. त्यात वाहतुक पोलिसांनी संभ्रमात टाकणारे उत्तर दिले आहे. दुभाजक टाकतांना महापालिकेने किंवा ठेकेदाराने परवानगी घेतली आहे का? असा सवाल केला असता, त्यावर कंत्राटदाराकडून ना हरकत दाखला मिळणेकरीता अर्ज या कार्यालयास अप्राप्त असल्याचे सांगितले आहे. मग दुभाजक का व कसे टाकले जातात. असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत असल्याचे डोंगरे यांनी सांगितले. केवळ ठाणेकरांना वेठीस धरण्याचाच हा प्रकार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.