उपवन तलावात बुडून कॉलेज तरुणाचा मृत्यू

ठाणे : ठाण्याच्या उपवन तलावात मित्रांसह पोहायला गेलेल्या १७ वर्षीय तरुणाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आपत्ती व्यवस्थापनाकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार उघडकीस आली.

आदित्य पवार असे या तरुणाचे नाव असून साई सहकार सोसायटी, लोकमान्य नगर पाडा क्रमांक ४ येथे राहत होता. येथील आर. जे. ठाकूर कॉलेजमध्ये तो इयत्ता १२वी मध्ये शिकत होता.

आदित्य आपल्या मित्रांसोबत उपवन तलावात पोहण्यासाठी सोमवारी (१७ जुलै) रोजी दुपारी १-४५ वाजण्याच्या सुमारास गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने आदित्य तलावात बुडाला.

ही घटना कळताच घटनास्थळी वर्तकनगर पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, तलाठी माजीवाडा, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी त्वरित दोन बोटींच्या सहाय्याने बेपत्ता आदित्यचा शोध सुरु केला. सायंकाळी ५ वाजता त्याचा मृतदेह सापडला असून तो वर्तकनगर पोलिसांकडे देण्यात आला आहे.