वाशीत श्री रामकृष्ण नेत्रालयच्या मायोपिया क्लिनिकचे उद्घाटन

लहान मुलांच्या डोळ्यांवरील उपचारात अधिक मदत

नवी मुंबई: सध्या वाढत्या मोबाईल वापरामुळे जागतिक स्तरावर लहान मुलांच्या डोळ्यातील विकारांचे प्रमाण २५ ते ३० टक्के आहे तर भविष्यात त्यात आणखी वाढ होऊन ती ५० टक्क्यांवर जाऊ शकते. याचे वेळीच निदान केले तर डोळ्यांचे नंबर कमी करता येऊ शकतात. त्याच अनुषंगाने झायाससारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीची कंपनी आणि नवी मुंबईतील प्रख्यात रामकृष्ण नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील पहिल्या मायोपिक क्लिनिकचे उद्घाटन नेरूळ सिनियर सिटिझन असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर यांच्या हस्ते वाशीत करण्यात आले.

मयोपिया उपचार म्हणजे चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्स वापरायला देणे. मायोपियाची वाढ मूल १८ वर्षे वयाचे होईपर्यंत वाढतच जाते. मायोपियाच्या प्रगतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी डोळ्यांचे ड्रॉप्स, विशेष मायोपिया नियंत्रण चष्मा आणि जीवनशैलीत बदल या उपचार पद्धती आहे. मायोपिया म्हणजे अदूरदर्शीपणा. या विकारात मूल जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकते, परंतु लांब अंतराची दृष्टी धूसर असते. अशा मुलांना मायनस पॉवरचा (नंबरचा चष्मा दिला जातो. अलीकडे मायोपिया या आजारामध्ये वाढ झाली आहे. जवळजवळ प्रत्येक सहा मुलांपैकी एका मुलाला हा विकार होतो. शाळा सुरु करण्यापूर्वी सर्व मुलांनी डोळ्यांची तपासणी केली पाहिजे. ही तपासणी मायोपिया आणि डोळ्यांच्या इतर समस्या शोधण्यास मदत करते. याशिवाय, दूरच्या दृष्टीमध्ये अडचण, खेळणी डोळ्यांजवळ धरणे, डोळे पिळणे किंवा तिरकस करणे, वारंवार लुकलुकणे, मायोपियाचा कौटुंबिक इतिहास, अशा सर्व मुलांनी वयाचा विचार न करता डोळ्यांची तपासणी करावी असे यावेळी रामकृष्ण नेत्रालयाचे अध्यक्ष डॉ. नितीन देशपांडे म्हणाले.

नवी मुंबई शहरातील लहान मुलांची संख्या पाहता येथील महापालिका आणि खासगी शाळेतील विद्यार्थ्यासाठी नेत्र तपासणीची मोफत शिबिरे भरवून डोळ्यांची तपासणी करून डोळ्यांचे नंबर कमी करण्याचा मानस देखील यावेळी डॉ.देशपांडे यांनी बोलून दाखवला. यावेळी माजी सैन्य अधिकारी दर्शन सिंग, माजी नगरसेवक संपत शेवाळे, डॉ. सुहास देशपांडे, डॉ. प्राजक्ता देशपांडे, डॉ.विजय शेट्टी, रंजीत दीक्षित आदी उपस्थित होते.