शहापूर:.तत्कालीन पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री असलेले व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या शहापूर बस पोर्टचे काम आजपर्यंत पूर्णत्वास गेले नाही. तथापी जुनी इमारत अति धोकादायक झाली असून कधीही खाली कोसळून मोठी जीवितहानी होऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.
१९७८ मध्ये बांधण्यात आलेल्या शहापूर बसस्थानकाचे जुने बांधकाम जीर्ण झाल्यामुळे या बस स्थानकाच्या जागेवर शासनाने चार वर्षांपूर्वी पाच कोटी रुपये निधी मंजूर केला. मात्र मागील चार वर्षांपासून बसपोर्ट रखडले असून विद्यार्थ्यांसह प्रवासी संताप व्यक्त करीत आहेत.
या बसस्थानकाची इमारत मोडकळीस आली असून तिच्या छपराला तडे गेले आहेत. इमारतीमधील स्टील देखील बाहेर आले आहे. त्यामुळे ही इमारत कोणत्याही क्षणी पडून मोठी जीवितहानी होऊ शकते. इमारत स्ट्रक्चरल ऑडिटनुसार धोकादायक ठरवण्यात आली असल्याने या बसस्थानकाच्या जागेवर पहिल्या बसपोर्टसाठी शासनाने निधी मंजूर केला. त्यामध्ये अनेक आधुनिक सुविधा असणार आहेत. परंतु चार वर्षे उलटूनही या बसस्थानकाचे काम २५ टक्केही पूर्ण झालेले नाही. सध्या ठेकेदाराने त्याचे काम बंद ठेवले आहे.
कामाचा पूर्णत्वाचा कालावधी संपला
या कामाचा पूर्णत्वाचा कालावधी १८ महिने होता, तो देखील संपला आहे. बसपोर्टचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या देखरेखीखाली होत असून नाशिक येथील एक कंपनी हे काम पाहत आहे. हे बसस्थानक मुंबई-आग्रा महामार्गालगत असल्याने येथे लांब पल्ल्याच्या बस थांबतात. या ठिकाणचे शौचालय बांधकामात तोडल्यामुळे महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे.
कोकणातील पहिला बसपोर्ट शहापूरात होत असल्याने खुप आनंद झाला होता. पण हे काम अर्धवट अवस्थेत असल्याने एसटी प्रवाशांची विशेषतः मुली आणि महिलांची कुचंबणा होत आहे. प्रशासन या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते की काय, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या डॉ.अपर्णा खाडे यांनी उपस्थित केला आहे.
शासनाने बसपोर्टच्या कामाला लवकरात लवकर गती देऊन हा विषय मार्गी लावावा. जुनी इमारत अत्यंत धोकादायक झाली असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती शिक्षिका वैशाली जागरे यांनी व्यक्त केली.