राजकारणात निवृत्तीचे वय काय असावे हा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऐरणीवर आणला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याची जखम ताजी असताना तिच्यातून वयाचा मुद्दा काढून खपली धरण्याची शक्यता मावळली आहे. ती भळभळा वाहतच राहणार आहे. महिलांना वय आणि पुरुषांना पगार विचारण्याची चूक कधी करु नये असे मानले जात असताना त्याच चालीवर नेत्याचे वय विचारु नये हा वाक्प्रचार राजकारणात पूर्वीच रुढ झाला होता. अजित पवार यांनी या सुधारित म्हणीचे उल्लंघन करुन एका नव्या वादास तोंड फोडले आहे.
भारतीय राजकारणात फार क्वचित चाळीशीच्या आत महत्त्वाची पदे मिळाल्याची उदाहरणे आहेत. श्री. शरद पवार १९७८ साली मुख्यमंत्री झाले तेव्हा ते ३८ वर्षांचे होते. त्यानंतर राजीव गांधी यांना बऱ्यापैकी तरुण असताना देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. सांप्रत काळात देवेंद्र फडणवीस आणि अरविंद केजरीवाल ही नावे घेता येतील. परंतु ही उदाहरणे अपवादात्मक आहेत. सर्वसाधारपणपणे देशाचे पंतप्रधानपद असो की राज्याचे मुख्यमंत्रीपद, ते मिळेत तेव्हा नेता साठीपार झालेला असतो. त्यामुळे साठीला ‘वयात आला’ असे बोलले जाऊ लागले. हा गोड गैरसमज स्वीकारून आपण आपलीच समजुत काढून घेत असतो
वयोवृध्द नेतृत्वाचे समर्थन करणारे अनुभवाचे मात्र भांडवल करीत असतात. त्यांच्या मते नेतृत्व करण्यासाठी तुम्ही किती उन्हाळे-पावसाळे पाहिले आहेत याला महत्त्व असते. अन्यथा राज्यशास्त्राचे पदवीधर तरुण मुख्यमंत्री होऊ शकले असते. पदे बहाल करताना शिक्षणाची पूर्वअटही राजकारणी बाद करीत असतात. किंबहुना या खुळचट विचाराला आम्ही राजमान्यता दिली.
ज्येष्ठतेबरोबर प्रशासकीय आकलन आणि पदाकडून असलेल्या अपेक्षापूर्तीसाठी लागणारी ऊर्जा आणि सचोटी हे मुद्दे मात्र वयाच्या निकषासमोर गळून पडतात. राजीव गांधी यांनी त्यांच्या वयाला शोभेसा अजेंडा (व्हिजन) पाहिला होता. केजरीवाल यांनी तरुणाईच्या मनात भ्रष्टाचारासारख्या समस्येबद्दल तिडीक हेरुन कार्यपध्दत अवलंबली. देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय डावपेच ही त्यांची नवीन ख्याती असली तरी ‘उद्याचा महाराष्ट्र’ ही संकल्पना ते पुढे रेटत आले. थोडक्यात नेत्याच्या वयाचा त्याच्या कार्यपद्धतीवर परिणाम होत असतो.
परदेशात काय स्थिती आहे? तिथे तर एकूणच आयुर्मान हे भारतीयांपेक्षा अधिक असते. परंतु मार्गारेट थॅचर, जो बायडन, ट्रम्प, ओबामा किंवा पुतिन यांच्या तुलनेत अनेक देशांचे राष्ट्रध्यक्ष वा पंतप्रधान चाळीशीच्या आत आहेत हे लक्षात घ्यायला हवे. इमॅन्युअल मॅक्रॉन-३९ (फ्रान्स) सेबॅस्टियन कुर्स (ऑस्ट्रिया) ओलाफ शॉल्झ (जर्मनी) ऋशी सुनाक (ब्रिटन), किंबहुना ब्रिटनने सातत्याने टॉनी ब्लेअर, डेव्हिड कॅमेरॉन, लिझ ट्रस यांसारखे चाळीशीतल्या पंतप्रधानांना संधी दिली आहे. भारतात तरुणांनी राजकारणात छाप पाडलेली उदाहरणे तुलनेने कमी असली तरी एक गोष्ट मान्य करावी लागेल की स्वातंत्र्यासाठी बलिदान करणारे ऐन विशीतले होते. म्हणजे राष्ट्रासाठी निःस्वार्थ हेतूने समर्पित करण्याची आसक्ती ज्या तरुणांमध्ये होती त्या तरुणांना आपला देश आधुनिक युगात विश्वात आघाडीवर असावा असेच वाटत असणार. तरीही त्यांना संधी का मिळू नये हा कळीचा मुद्दा आहे.
जगभरात अनेक देशांत प्रस्थापितांविरुध्द जो उठाव होत आहे त्याचे नेतृत्व तरुणाई करीत आहे. रस्त्यावर उतरुन जीवाची बाजी लावणारे, प्रसंगी सरकारच्या जुलमाविरुध्द झुंज देताना धारातीर्थी पडणारे तरुणच आहेत. जगभरात एकीकडे तरुणांचे इतके रक्त सांडले जात आहे, त्यांच्या वाट्याला इतकी उपेक्षा का यावी हाही प्रश्नच आहे.
आपण पुन्हा भारतीय तरुणांच्या राजकीय उपेक्षेकडे वळू या. भारतातही आंदोलने होतात. त्यात तरुण आघाडीवर आहेत, यातही दुमत नाही. परंतु त्यांच्या या कृतीला समर्पणाचा गंध येण्याऐवजी स्वार्थाचा दुर्गंध येतो हे कटू सत्य मान्य करावे लागेल. राजकारणाकडे करिअर म्हणून पहावे असे बुजुर्ग नेते सांगत असतात. परंतु त्यासाठी स्वत:ची जागा रिकामी करुन देणारे खचितच आढळतात. या तरुणांचा अत्यंत शिताफीने ‘वापर’ करण्याची सर्वपक्षीय राजकीय खेळी तरुणांना आपली खरी ओळख आणि क्षमता पूर्णपणे समाजहीत आणि राष्ट्रउभारणीच्या कार्यात वापरण्यापासून वंचित ठेवत आहे. जाती-पातीच्या राजकारणात त्यांना रममाण करुन पुढे पैशांची चटक लावणारी राजकारणातील निवृत्ती नाकारणारी पिढी तरुणांना सत्तेचे सुकाणू देईल असे वाटत नाही. यासाठी तरुणांनीच या सर्व शृंखला तोडण्याची गरज आहे. अर्थात त्यासाठी प्रचलित राजकारणातील खोलवर रुजलेल्या अनिष्ठ रीतींना त्यांना त्यागावे लागेल. राजकीय पक्षांची तत्वप्रणाली असते आणि एक विचारधाराही असते. ती अडगळीतून काढून त्यावर काम झाले तर भारतीय राजकारणाचा पोत बदलू शकतो. यासाठी राष्ट्रभिमान आणि सर्वसमावेशक विकास या दोन सूत्रांवरच त्यांनी काम करायला हवे. तसे काम करणारी पिढी पुढे आली तर निवृत्तीची मागणी करण्याची वेळही येणार नाही. त्यासाठी तरुणांच्या मनात मात्र आग लागायला हवी. पण निदान या क्षणी तरी अनेक तरुण मतदार मतदानच करायचे नाही असा निर्णयावर आले आहेत.