ठाणे: दिव्यामध्ये दोन नव्हे तर चक्क ४३ शाळा अनधिकृत असून त्यामध्ये इंग्रजी माध्यमांची संख्या सर्वाधिक आहे. या अनधिकृत शाळांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यातील विद्यार्थ्यांचे जवळच्या अधिकृत शाळांमध्ये समायोजन करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.
शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधीच कारवाई करून येथील विद्यार्थ्यांचे अधिकृत शाळांमध्ये समायोजन होणे अपेक्षित होते. मात्र शासन निर्देशांना केराची टोपली दाखवत पालिकेच्या शिक्षण विभागाने अद्यापी या अनधिकृत शाळांना टाळे ठोकलेले नाही. परिणामी दिव्यातील सुमारे ११ हजारहून अधिक विद्यार्थ्यांचे समायोजन रखडले असून त्यांचे शैक्षणिक भवितव्यदेखील टांगणीला लागले आहे,
दिव्यामध्ये लोकसंख्येच्या तुलनेत शाळांची संख्या कमी आहे. ही समावेश आहे. त्यामुळे येथील पालकांना आपल्या मुलांना ठाणे किंवा डोंबिवलीच्या शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. नेमकी ही बाब हेरून दिव्यामध्ये बेकायदा शाळांनीही आपली ‘पटसंख्या’ वाढवण्यास सुरुवात केली आहे. भाड्यांच्या घरांमध्ये, इमारतींमध्ये किंवा छोट्याशा गाळ्यांमध्ये या अनधिकृत शाळा भरवल्या जात आहेत. यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या सर्वाधिक आहे.
दिव्यात एकूण सुमारे ६५ शाळा असून त्यापैकी ४३ शाळा या अनधिकृत असून त्यामध्ये सुमारे १० हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अतिशय गरीब कुटुंबातील हे विद्यार्थी असून स्वस्तात प्रवेश मिळत असल्याने पालकही या शाळांना बळी पडत आहेत. अशा शाळांची यादीच मेस्टा या संस्थेने जाहिर केली असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणार्या या शाळांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या अनधिकृत शाळांवर जोपर्यंत कारवाई होत नाही म्हणजेच त्यांना टाळे लागत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन करता येणार नाही. ही बाब माहित असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अधांतरी राहण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात ठाणे महापालिकेचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या अनधिकृत शाळांच्या वृत्तास दुजोरा दिला. या ४३ शाळांवर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून या शाळांमधील विद्यार्थ्यांचे समायोजन जवळील अधिकृत शाळांमध्ये समायोजन करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिल्याचेही श्री. राक्षे यांनी ‘ठाणेवैभव’ला सांगितले.
आरंभ इंग्लिश स्कूल, न्यू गुरुकूल इश्लिश स्कूल, आगापे इंग्लिश स्कूल, नालंदा हिंदी विद्यालय, आदर्श विद्यालय, आदर्श विद्यालय, रेनबो इंग्लिश स्कूल, सिम्बॉयसिस हायस्कूल, जीवन इंग्लिश स्कूल, एम एस इंग्लिश स्कूल, कुबरेश्वर महादेव इंग्लिश स्कूल, आर एल पी हायस्कूल, आदर्श गुरूकूल स्कूल, आदर्श गुरुकूल, श्री दत्तात्रय कृपा इंग्लिश स्कूल, एस आर पी इंग्लिश स्कूल, एस एस मेमोरियल इंग्लिश स्कूल, न्यू एस एच इंग्लिश स्कूल, ओम साई इंग्लिश स्कूल, स्टार इंग्लिश हायस्कूल, श्री विद्या ज्योती इंग्लिश स्कूल, कॅब्रिज इंग्लिश स्कूल, पब्लिक इंग्लिश स्कूल, पब्लिक मराठी स्कूल, ट्वींकल स्टार इंग्लिश स्कूल, होली एंजल इग्लिश स्कूल, आर्या गुरुकूल, सेंट सायमन हायस्कूल, शिव दीक्षा इंग्लिश स्कूल, श्रीराम कृष्णा इंग्लिश स्कूल, होली मारिया कॉन्व्हेंट हायस्कूल, केंट व्हॅली इंटरनॅशनल स्कूल, ब्रायटन इंटरनॅश्नल इंग्लिश स्कूल, गुंजन पाल इंग्लिश स्कूल, अक्षर इंग्लिश स्कूल, स्मार्ट एज्युकेशन इंग्लिश स्कूल, यंग मास्टर इंग्लिश स्कूल, जे डी इंग्लिश स्कूल, एसएस इंडीया हायस्कूल, एस आर इंग्लिश स्कूल, ग्रीन व्हॅली स्कूल, भारत इंग्लिश स्कूल, एस एस इंडिया हायस्कूल, केदारनाथ इंग्लिश स्कूल.
अनधिकृत शाळांमधील विद्यार्थ्यांच्या समायोजनासाठी सुमरे ११ हजार ४०० जागा अधिकृत शाळांमध्ये शिल्लक आहेत. त्यासाठी चालू शैक्षणिक फी वरही पाणी सोडण्यास काही शाळा तयार असल्याचे समजते. पण जोपर्यंत अनधिकृत शाळा बंद होत नाहीत, तोपर्यंत हे समायोजन होणे शक्य नसल्याचे मेस्टा संघटनेचे पदाधिकारी उत्तर सावंत यांनी सांगितले.