आयुक्त अभिजित बांगर यांचा इशारा
ठाणे : शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे १२ तासांच्या आत दुरुस्त करून चांगले रस्ते नागरिकांना द्यावेत अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिला आहे. ६०५ कोटीच्या रस्त्यांची कामे १ जुलैनंतर सुरू राहणार नाहीत याची दक्षता घ्या, असा सज्जड दमही त्यांनी दिला आहे.
महापालिकेने 605 कोटीच्या पॅकेजअंतर्गत हाती घेतलेल्या रस्त्यांची कामे जवळपास 90 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. सद्यस्थितीत सुरु असलेली कामे 30 जूनपर्यंत संपवावीत. 1 जुलैपासून कुठल्याही परिस्थितीत रस्त्यांची कामे चालू असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. यासाठी उर्वरित कामे पावसाळा कालावधीनंतर पूर्ण करण्यात यावीत. पावसाळयाच्या दरम्यान मुळातच वाहतूकीचा वेग कमी होतो आणि त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो. त्यात रस्त्यांची कामे सुरू असतील तर त्यामुळे वाहतूक वळविणे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर 1 जुलैनंतर शहरात एकाही रस्त्याचे काम सुरू नसावे, सर्व सुरू असणारी कामे पूर्ण करुन अथवा या रस्त्यांवरुन वाहतूक सुरू राहू शकेल या स्थितीमध्ये आणून संपूर्ण शहरात वाहतूक सुरळीत राहिल या दृष्टीने नियोजन करावे अशा सूचना आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत दिल्या.
शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यामुळे त्या ठिकाणी खड्डेमुक्त पद्धतीने प्रवास करणे नागरिकांना शक्य होणार आहे. मात्र, त्या व्यतिरिक्त इतर रस्त्यांवर जर खड्डा पडला तर तो यंत्रणेच्या त्वरीत निदर्शनास येणे आवश्यक आहे. त्यासाठी शाखा अभियत्यांपासून ते नगर अभियंत्यापर्यंत संपूर्ण यंत्रणा पुढील चार महिने त्यांच्या कार्यक्षेत्रात फिरत राहतील. एखाद्या रस्त्यावर खड्डा पडण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे, हे निदर्शनास आल्यास त्वरीत त्या रस्त्यांची डागडुजी अत्यंत तातडीने व प्राधान्याने होईल याची दक्षता घ्यावी. रस्त्याचा पृष्ठभाग उखडला जात आहे किंवा कसे यावर यंत्रणेने लक्ष ठेवून तर असावेच तसेच नागरिक, लोकप्रतिनिधी व प्रसारमाध्यमे यांच्या माध्यमातून येणारा फिडबॅक आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा असून त्यावर बारा तासांच्या आत कार्यवाही होईल हे देखील सुनिश्चित करावे. कोणत्याही परिस्थितीत बारा तासांच्या कालमर्यादेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. शहरामधील काही रस्ते एमएमआरडीए, एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी इ. यंत्रणांच्या ताब्यात आहेत. अशा सर्व रस्त्यांवर जर खड्डा दिसला तर त्या यंत्रणेने रस्त्यांची दुरूस्ती करण्याची वाट न बघता महानगरपालिकेने आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून तातडीने दुरूस्ती केली जाईल हे सुनिश्चित करावे, असेही आयुक्तांनी या बैठकीत नमूद केले.
दरवर्षी पाणी साचणाऱ्या ठिकाणांवर पावसाळी पाण्याचा निचरा जलद गतीने व्हावा यासाठी मागच्या वर्षी पेक्षा दुप्पट म्हणजे एकूण 58 पंप उपलब्ध केले आहेत. तसेच मोक्याची ठिकाणी अतिवृष्टीच्या वेळी जर वीजप्रवाह खंडित झाला तर पंप सुरू रहावा यासाठी बॅकअपची व्यवस्था करण्यात यावी असेही आयुक्त श्री. बांगर यांनी नमूद केले.
सदर बैठकीस नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, उपनगरअभियंता विकास ढोले, रामदास शिंदे यांच्यासह कार्यकारी अभियंता उपस्थित होते.