धोकादायक इमारतीत आवश्यक ठिकाणी देणार खांबांचा आधार

एपीएमसी प्रशासनाचा मान्सून पूर्व कामांचा पाहणी दौरा

नवी मुंबई : वाशीतील कृषी उत्पन्न बाजार आवारातील धोकादायक झालेल्या कांदा-बटाटा बाजाराच्या पुर्नबांधकामाचा जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत कांदा-बटाटा मार्केटमधील सार्वजनिक, सामूहिक जागेत, शेतमाल चढउतार धक्यावरील छत व कॅन्टीन व त्यालगतचा परिसराची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती, आवश्यक ती डागडूजी करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली होती. त्या अनुषंगाने एपीएमसी प्रशासनाचे सचिव राजेश भुसारी तसेच माजी सभापती अशोक डक यांनी कांदा बटाटा बाजाराची पाहणी केली.

पावसाळापूर्व अत्यावश्यक कामे तसेच छत कोसळणाऱ्या ठिकाणी तात्पुरती दुरुस्ती करण्याच्या सूचना केल्या आहेत. धोकादायक इमारती जाहीर केल्याने या ठिकाणी कोणत्याही प्रकारची दुरुस्ती किंवा डागडुजी करता येणार नाही, त्यामुळे आवश्यक ठिकाणी खांबांचा आधार देण्यात येईल, असे मत प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.

आता पावसाळा सुरु होईल, त्यामुळे कांदा-बटाटा बाजारात कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने कांदा, बटाटा बाजारातील कॅन्टीन, स्वच्छतागृहे त्यालगतचा परिसर, शेतमाल चढउतार धक्यावरील छताची दुरुस्ती किंवा योग्य त्या ठिकाणी सपोर्ट देणे अशा प्रकारे डागडुजी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. पावसाळ्यात पडझड होवू शकते त्यासाठी बाजारातील सार्वजनिक पॅसेजची दुरुस्ती बाजार समितीने तातडीने करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने एपीएमसी सचिव राजेश भुसारी तसेच सभापती अशोक डक यांच्यासह संचालक अशोक वाळुंज यांनी कांदा बटाटा बाजाराची पाहणी केली. या पाहणी दरम्यान बाजारातील पावसाळापूर्व कामे नालेसफाई, स्वच्छता तसेच सामायिक ठिकाणी तात्काळ तात्पुरती दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एपीएमसी बाजारातील धोकादायक इमारतींची कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही, त्यामुळे आवश्यक त्या ठिकाणी आधार देण्यासाठी आतापर्यंत १५० खांब लावण्यात आलेले आहेत. यापुढेही आवश्यक ठिकाणी आणखीन टेकू लावण्यात येतील, अशी माहिती एपीएमसीचे माजी सभापती अशोक डक यांनी दिली आहे.