ठाणे मनोरूग्णालयात कंत्राटी सफाई कामगारांकडून ठेकेदाराचा निषेध

ठाणे : मनोरुग्णालयात गेल्या चार वर्षांपासून ‘लोकराज्य स्वयंमरोजगार सेवा सहकारी संस्था’मार्फत काम सुरू आहे. चार वर्षांपूर्वी जे वेतन दिले होते, त्यात कोणतीही वाढ न देता तेच वेतन आजही देत असल्यामुळे सफाई कामगार नाराज झाले आहेत. दर सहा महिन्यांनी वाढणारे विशेष भत्त्याची रक्कम ठेकेदार कामगारांना देत नाही. त्याच्याकडून किमान वेतन अधिनियम १९४८ चे अनुपालन केले जात नाही,असा आरोप सफाई कामगारांनी केला.

मासिक वेतन ७ तारखेच्या आत देण्याचे न्यायालयाचे आदेश असताना ठेकेदार कामगारांना कधीही वेळेवर वेतन अदा करत नाही, वेतनाची स्लिप दिली जात नाही शिवाय राज्य कामगार विमा योजनेची रक्कम पगारातून कपात करूनही पूर्ण रक्कम विमा कार्यालयात भरत नसल्यामुळे कामगारांना वैद्यकीय उपचार आणि वैद्यकीय प्रतिपूर्ती लाभ कर्मचा-यांना मिळत नाही, असाही आरोप कामगारांनी केला. कर्मचा-यांना वार्षिक भरपगारी रजा किंवा रजेचे वेतन अदा केले जात नाही. रेनकोट, गमबूट, साबण, टॉवेल आदी सुरक्षा साहित्य दिले जात नाही, असेही कामगारांचे म्हणणे आहे.

कामगार उपायुक्त कार्यालयातर्फे ठेकेदाराच्या विरोधात चार फौजदारी गुन्हे दाखल करूनही रूग्णालय प्रशासन ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याने कामगारांचे शोषण होत आहे, असा आरोप ‘श्रमिक जनता संघ’ने केला.

कायदेशीर वेतन द्या, वेतन स्लिप मिळाली पाहिजे, वेतनातून बेकायदेशीरपणे कपात केलेली रक्कम मागील फरकासह अदा करा. वार्षिक भरपगारी रजा द्या किंवा रजेचे वेतन अदा करा, वेतन दर महिना सात तारखेपर्यंत मिळालेच पाहिजे, वैद्यकीय उपचार व वैद्यकीय रजा प्रतिपूर्ती खर्च अदा करा याशिवाय रेनकोट, गमबूट, साबण, टॉवेल, गणवेश आदी सुरक्षा साहित्य द्या, अशी मागणी ‘श्रमिक जनता संघ’चे सरचिटणीस जगदीश खैरालिया, संघटक दीनानाथ देसले आणि संघटक अनिता कुमावत यांनी केली आहे.