आयआयटी तज्ञांना रस्ते कामात आढळल्या त्रुटी

दुरुस्ती करणार की आयुक्तांकडून होणार कारवाई?
ठाणेकर दक्ष नागरिकांकडून प्रश्न उपस्थित

ठाणे : ठाणे शहराला राज्य शासनाकडून उपलब्ध झालेल्या 605 कोटी रुपयांच्या निधीतंर्गत विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. या सर्व कामांच्या पहिल्या टप्प्यातील पाहणी नुकतीच आय.आय.टीच्या तज्ज्ञांनी पूर्ण केली. या पाहणीत काही कामे समाधानकारक तर काही कामांमध्ये तांत्रिक त्रुटी आढळल्याची माहिती प्रशासनाने दिली.
तज्ज्ञांनी नुकत्याच केलेल्या पाहणीनंतर ज्या कामांमध्ये सुधारणा आवश्यक आहेत, तसेच काही ठिकाणी तांत्रिक बाबी पाळल्या गेलेल्या नव्हत्या, त्याबद्दल दुरुस्ती सुचवण्यात आली आहे. या गोष्टींची पूर्तता झाल्यावरच रस्त्याचा दर्जा अपेक्षेप्रमाणे राहील, असे त्यांनी सांगितले. या सर्व बाबींचा आढावा आयआयटीच्या तज्ज्ञांनी शनिवार ३ जून रोजी महापालिकेतील सर्व अभियंते आणि ठेकेदारांसमोर सादर केला. या सर्व कामांची फिनीशिंग होण्यापूर्वी सर्व कामे तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्तम व्हावीत, यासाठी आवश्यक असलेले बदल करण्यासाठी कोणती पावले उचलावीत याबाबतचे मार्गदर्शन त्यांनी कार्यशाळेत केले.ठाणे महापालिकेच्या वतीने शनिवारी महापालिकेतील सर्व अभियंते व ठेकेदार यांचेसाठी नागरी संशोधन केंद्र येथे कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यशाळेस आयुक्त अभिजीत बांगर, आयआयटी मुंबईचे उपसंचालक प्रा. श्री. के.व्ही. क्रिष्णा राव, प्रा. श्री. सोलोमन देबार्मा आणि सहकारी उपस्थित होते. या कार्यशाळेत आयआयटीच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. रस्त्याची कामे करताना त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचा दर्जा कसा ओळखावा, कामाचे गुणवत्ता मुल्यांकन, गुणवत्ता नियंत्रण तसेच काम करण्याची योग्य पध्दत, रस्त्यांसाठी करावयाच्या चाचण्या, वातावरण व तापमान यांचा होणारा परिणाम, काम गुणवत्तापूर्वक होण्यासाठी करावयाच्या इतर बाबी, तांत्रिक बाबींचे विश्लेषण व इतर अनुषंगिक बाबींबाबतचे मार्गदर्शन केले. यावेळी अभियंत्यांना रस्त्यांचे काम करताना येत असलेल्या तांत्रिक अडचणींचेही निराकरण करण्यात आले.

काँक्रीट भरल्यानंतर बारा तासाच्या आत ठराविक अंतरावर रस्ता कट करणे आवश्यक असते, अन्यथा रस्त्याला तडे पडण्याची शक्यता असते. तसेच मास्टीक पध्दतीचा रस्ता बनविल्यानंतर त्यावरुन वाहतूक झाली तर रस्ता गुळगुळीत होतो अन्यथा तो खडबडीत राहतो. त्यामुळे आलटून पालटून अशा पध्दतीने प्रत्येक लेनमधून ट्रॅफिकची वाहतूक होईल हे सुनिश्चित करावे, अशा पध्दतीचे काही तांत्रिक सल्ले या कार्यशाळेत देण्यात आले.

ठाणे महानगरपालिकेने रस्त्याच्या कामाचे त्रयस्थ तांत्रिक लेखापरीक्षण करण्यासाठी आय.आय.टी. मुंबई यांची नेमणूक केली आहे. ठाणे शहरात ६०५ कोटी रुपयांच्या निधीतंर्गत रस्त्यांच्या झालेल्या कामांचा व सुरू असलेल्या कामांचा आढावा आय.आय.टीच्या तज्ज्ञांनी घेतला. यावेळी नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उपनगरअभियंता रामदास शिंदे यांच्यासह महापालिकेतील सर्व अभियंते, ठेकेदार उपस्थित होते.

२८२ कामांमध्ये २८२ ठिकाणी कोअर कटींग केले जाते. हे सर्व नमुने आयआयटीची प्रयोगशाळा किंवा आयआयटीच्या निरीक्षणाखाली असलेल्या इतर प्रयोगशाळांमध्ये तपासून घेतले जावेत. कोअर कटींग कुठे घ्यायचे हे ज्यांनी काम केले आहे त्यांनी न ठरवता त्रयस्थ पध्दतीने ठरविले जाईल. डांबरीकरणाची व मास्टीक पध्दतीची कामे अंतिम टप्प्यात असून यूटीडब्ल्यूटी आणि काँक्रीटची कामे येत्या काही दिवसात पूर्ण होतील. कामाच्या फिनींशीगकडे लक्ष द्यावे, थर्मोप्लास्ट पेंटसहीत रोड मार्कींग तयार झाल्यानंतर काम खऱ्या अर्थाने पूर्ण होईल, असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.