आ. संजय केळकर यांचे कौतुकोद्गार
ठाणे: ४७ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ठाणेवैभव करंडक स्पर्धेत व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांच्या माध्यमातून बल्लाळांची तिसरी पिढी कार्यरत आहे. या आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन-नियोजन कौतुकास्पद आहे, असे कौतुकोद्गार ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी काढले.
शनिवारी ४७व्या ‘ठाणेवैभव’ करंडक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय केळकर दादोजी कोंडदेव क्रीडा सभागृहात उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
‘ठाणेवैभव’चे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धा समितीचे समन्वयक अभय हडप, एमसीएचे कार्यकारिणी सदस्य कौशिक गोडबोले, ठाण्याचे माजी नगरसेवक विकास रेपाळे व्यासपीठावर उपस्थित होते. स्पर्धा समन्वयक प्रल्हाद नाखवा यांनी सूत्रसंचालन केले.
याप्रसंगी ठाण्याचे ज्येष्ठ अष्टपैलू खेळाडू मुकुंद सातघरे, ‘अ’ गटात प्रथमच अजिंक्य ठरलेल्या डीटीडीसीचे उपाध्यक्ष शिव रावत तसेच डीटीडीसीचे सहाय्यक महाप्रबंधक मनीष सिन्हा उपस्थित होते. यंदाचा चौथ्या वर्षीचा प्रभाकर नारायण गुजराथी पुरस्कार स्पर्धेतील सर्वोत्तम शिस्तबद्ध संघ अभ्युदय बँकेच्या संघाला देण्यात आला. कर्णधार संजू राऊत यांनी या विशेष पुरस्काराचा स्वीकार केला.