मविआचा लोकसभेसाठी १६-१६-१६ चा फॉर्म्युला?

मुंबई: लोकसभा निवडणुका आता अवघ्या एका वर्षाच्या अंतरावर आहेत. सर्व पक्षांनी यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाराष्ट्रातील पक्षही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीच्या बैठका सुरू झाल्या आहेत. या बैठकांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचं बोललं जात आहे.

महाविकास आघाडीच्या सातत्याने बैठका होत आहेत. पक्षांची आगामी रणनीती, महाविकास आघाडीच्या सभा आणि जागावाटपाबाबत यामध्ये चर्चा होत असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक गेल्या आठवड्यात पार पडली. या बैठकीला ठाकरे गटाकडून स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाई जगताप यांच्यासह अनेक मोठे उपस्थित होते. या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा फॉर्म्युला ठरला असल्याचं बोललं जात आहे.

महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलाबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी आज थेट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारला. महाविकास आघाडीचा १६-१६-१६ जागांचा फॉर्म्युला ठरला आहे का? असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. यावर संजय राऊत म्हणाले, असा कोणताही फॉर्म्युला ठरला नाही. अशा कोणत्याही फॉर्म्युलावर कुठलीही चर्चा झालेली नाही. आम्ही तिन्ही पक्षांचे सगळे प्रमुख नेते एकत्र बसू आणि यावर निर्णय घेऊ.

खासदार संजय राऊत म्हणाले, मागच्या लोकसभेत म्हणजेच आताच्या लोकसभेत आमच्या (शिवसेना ठाकरे गट) १९ जागा आहेत. अर्थात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात ते बरोबर आहे. महाराष्ट्रात जागा वाटप करताना तीन पक्षात समन्वय साधण्यासाठी काही गोष्टींचा विचार करावा लागेल. काही जागांची अदलाबदल करावी लागेल हे सत्य आहे. काही ठिकाणी तडजोडी कराव्या लागतील.