दाम्पत्यासह दोन चिमुकले भाजले
ठाणे : छतावरून गेलेल्या टाटा पॉवरच्या केबलचा स्पर्श होऊन चाळीतल्या दोन घरांना आग लागल्याची घटना मुंब्रा येथील शिवाजी नगरातील झगडे चाळ येथे सोमवारी दुपारी 1 च्या सुमारास समोर आली. या आगीत एकाच कुटुंबातील चार जण आगीत गंभीररीत्या होरपळून जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पतीपत्नीसह चार व पाच वर्षीय दोन चिमुकल्यांचा समावेश आहे.
सोमवारी दुपारी 1च्या सुमारास मुंब्रातील झगडे चाळ, शिवाजी नगर या ठिकाणी छतावरून गेलेली टाटा पॉवरची केबल चाळीतील घराच्या छताला स्पर्श होऊन चाळीतील दोन घरांना आग लागली. यावेळी दोन्ही घरातील समान जाळून राख झाले. तर या आगीत एकाच कुटुंबातील चार जण गंभीररीत्या भाजून जखमी झाले आहेत. आलिमुद्दिन सय्यद (35), सलमा सय्यद (30), फातिमा सय्यद (4 वर्ष), आलिना सय्यद (5 वर्ष) अशी जखमी झालेल्या चौघांची नावे आहेत.
चौघांना उपचारासाठी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी टोरंट पॉवर विद्युत कर्मचारी, मुंब्रा पोलीस पोलीस, अग्निशमन दलाचे जवान एक फायर वाहनासह व एक रेस्क्यू वाहनासह उपस्थित झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग एका तासाच्या परिश्रमानंतर नियंत्रणात आणली.