अर्जुना रणतुंगा प्रथमच ठाण्यात येणार

ठाणे: सन १९९६ चे वर्ल्डकप विजेते श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुना रणतुंगा हे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विनंतीवरून ओवळा-माजिवडा मतदारसंघातील विविध विकास प्रकल्पांची व क्रिकेटच्या मैदानांची पाहणी करण्याकरिता मंगळवार २३ मे, २०२३ रोजी ठाणे शहरामध्ये येणार आहेत.

यावेळी लोकमान्यनगर येथील स्व. रामचंद्र ठाकुर तरण तलावाच्या ठिकाणी आमदार प्रताप सरनाईक यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेली व्यायामशाळा व त्यामधील साहित्याचे लोकार्पणाचा कार्यक्रम श्रीलंकन माजी कर्णधार अर्जुना रणतुंगा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये लोकमान्यनगर व वर्तकनगर परिसरातील क्रिकेट खेळणाऱ्या लहान मुलांशी माजी कर्णधार अर्जुना रणतुंगा संवाद साधून क्रीडाप्रेमींना मार्गदर्शनही करणार आहेत. त्याचप्रमाणे यावेळी गरीब व गरजू क्रीडापट्टूना मोफत क्रीडा साहित्याचे वाटप रणतुंगा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

ठाणे शहरामध्ये अनेक क्रीडापट्टू असून मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे चाहते आहेत. ठाणे शहरामध्ये एम.सी.ए.च्या माध्यमातून आय.पी.एल. क्रिकेट स्पर्धा देखील घेण्यात आल्या. त्यातच सन १९९६ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत बलाढ्य संघाबरोबर सामना करून विश्वकप विजेता बनण्यामध्ये श्रीलंकन संघातील इतर खेळाडूंप्रमाणे माजी कर्णधार अर्जुना रणतुंगा यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये रणतुंगा यांच्याबद्दल आकर्षण असून त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात ठाणे शहरामध्ये आहे.

कासारवडवली येथील आनंदनगर पोलिस स्टेशनच्या समोर असलेली सुमारे २२ एकर जागा स्टेडियमसाठी आरक्षित असून ९० टक्के जागा महानगरपालिकेकडे हस्तांतरीत झालेली आहे. भविष्यामध्ये तेथे क्रिकेट स्टेडियम बनविण्यात यावे यासाठी श्री.सरनाईक शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. बिकेसी येथील एम.सी.ए.च्या मार्गदर्शनाखाली या जागेवर इंदौर स्टेडियमप्रमाणे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी श्री. सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली असता त्याकरिता मुख्यमंत्री देखील अनुकुल आहेत. त्याबाबतीतही लवकरच शासन निर्णय होणार असल्यामुळे या जागेची पाहणी करण्यासाठी रणतुंगा यांना आमदार प्रताप सरनाईक विनंती करणार आहेत.