नागरिकांचे स्थलांतर करण्याचे आयुक्तांचे निर्देश
नवी मुंबई: दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या १५ संभाव्य ठिकाणांची संबंधित विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविणेबाबत त्वरित कार्यवाही सुरु करावी असेही बैठकीमध्ये आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले होते.
आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे नमुंमपा क्षेत्रातील 15 संभाव्य ठिकाणांची यादी प्राप्त झाली असून त्यामधील रमेश मेटल कॉरी परिसराला भेट देऊन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे तसेच विभाग अधिकारी व विभागातील संबंधित अधिकारी यांच्यासह प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली.
पावसाळी कालावधीपूर्वी खबरदारीची उपाययोजना म्हणून येथील नागरिकांना सुयोग्य जागी हलविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. अशाच प्रकारे सर्व विभाग कार्यालयांनीही आपापल्या क्षेत्रातील दगडखाणी परिसर व दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी काटेकोर लक्ष ठेवून तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची कार्यवाही करावी असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
तुर्भे एमआयडीसी परिसरातील मेढकर कॉरी भागात सुरु असलेल्या नालेसफाई कामाचीही आयुक्तांनी बारकाईने पाहणी केली. याठिकाणी डोंगर भागातून वाहत येणारे मोठे दगड नाल्यांमधून वाहत येत असल्याने कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात काही भागांमध्ये नैसर्गिक नाल्यांच्या प्रवाहात झोपड्या असल्यास त्याही हटवून तेथील नागरिकांना स्थलांतरित करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांमार्फत देण्यात आले.
याप्रसंगी एमआयडीसी क्षेत्रात नेरुळ डी ब्लॉकमध्ये सुरु असलेल्या रस्ते कॉँक्रिटीकरण कामांचीही पाहणी करत आयुक्त श्री. नार्वेकर यांनी पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करून त्यांच्या गुणवत्तेकडेही विशेष लक्ष देण्याचे निर्देश अभियांत्रिकी विभागाला दिले.