रेल्वे पुलावर तरुणीला मिठी; माथेफिरूला प्रवाशांकडून चोप

डोंबिवली : सकाळी गर्दीच्या वेळी एका माथेफिरू तरुणाने कल्याण रेल्वे पुलावर एका तरुणीला मिठी मारल्याची घटना घडली. रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने तरुणाला अटक केली असून डोंबिवली शहरात अशी घटना घडू नये म्हणून माजी नगरसेविका रेल्वे प्रशासनाला पत्र देणार आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष शर्मा असे माथेफिरू तरुणाचे नाव आहे. कल्याण रेल्वे पुलावर सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास लोकल पकडण्यासाठी आलेल्या तरुणीला अचानक समोरून संतोषने मिठी मारल्याने ती घाबरली. हा सर्व प्रकार पुलावरील प्रवाशांनी पाहिला. घाबरलेली तरुणी निघून गेली असली तरी प्रवाशांनी त्या तरुणाला चांगलाच चोप दिला. ही सर्व घटना पुलावरील सीसीटीव्हीच्या कॅमेरात बंद असून  या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी संतोषचा शोध घेतला. संतोष कल्याण रेल्वे स्थानकाच्या फलाट नंबर १ वर फिरत होता. रेल्वे पोलिसांनी फलाटाकडे धाव घेत संतोषला अटक केली. दरम्यान उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेच्या सरचिटणीस तथा तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला.

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात गर्दुल्ले आणि फेरीवाले यांची वर्दळ असते. रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस गर्दुल्ल्यांना स्थानकाबाहेर काढण्यास कमी पडल्याचे या घटनेनंतर दिसून येत आहे. काही जागरूक प्रवाशांनी `गर्दुल्ले मुक्त कल्याण रेल्वे स्थानक परिसर` करण्यासाठी एकत्र येऊन जनजागृती करण्याचे ठरविले आहे. प्रत्येक स्थानकात हीच परिस्थिती दिसते.

डोंबिवली रेल्वे पुलावर व स्थानकात प्रवाशांना अद्याप गर्दुल्ल्यांचा त्रास झाला नाही. मात्र फलाट क्र.१ वर गर्दुल्ले व भिकारी बसलेले दिसतात. कल्याण रेल्वे स्थानकात घडलेल्या घटनेवरून डोंबिवली रेल्वे पोलिसांनी स्थानक व परिसरातील गर्दुल्ले व भिकारी यांना हटविणे आवश्यक आहे. डोंबिवली रेल्वे स्थानक फलाट नंबर १ बाहेर बेशिस्त रिक्षाचालक प्रवाशांना त्रास होईल अशा पद्धतीने रिक्षा उभ्या करत असतात. रेल्वे पोलिसांनी स्थानकाबाहेर रिक्षाचालकांच्या मनमानीबाबत वाहतूक पोलिसांना कळविणे गरजेचे आहे असे महिला सांगत आहेत. कल्याणमधील या घटनेनंतर डोंबिवली रेल्वे पोलिसांनी याबाबत जागरूक होणे गरजेचे आहे असेही महिला सांगत आहेत. याबाबत माजी नगरसेविका मनीषा धात्रक या डोंबिवली रेल्वे महाव्यवस्थापक यांना पत्र देणार असल्याचे समजते.