अंबरनाथ चित्रपट महोत्सव दिमाखात
अंबरनाथ: ज्येष्ठ सिने दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना यंदाचा अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अंबर भरारी, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने आठवा अंबरनाथ मराठी चित्रपट पुरस्कार सोहोळा रविवारी अंबरनाथच्या गावदेवी मैदानात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात अभिनेते जयंत सावरकर याना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय ज्येष्ठ गायक श्रीधर फडके यांना कारकीर्द गौरव, तर कुमार सोहोनी यांना कारकीर्द सन्मान, गिरीश कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मोनालीसा बागल, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कृषी देशपांडे आणि स्वानंदी बेर्डे हिला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जयंत सावरकर यांना आमदार डॉ. बालाजी किणीकर, दिगदर्शक राजदत्त, श्रीधर फडके, उषा नाडकर्णी, महेंद्र पाटील, सुनील चौधरी आदींच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
येथील माजी नगराध्यक्ष आणि अंबर भरारीचे संस्थापक अध्यक्ष सुनील चौधरी यांच्या पुढाकारातून गेल्या सात वर्षांपासून मराठी चित्रपट महोत्सव पारितोषिक वितरण करण्यात येते. यंदाच्या चित्रपट महोत्सवात समायरा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. महोत्सवात विविध प्रकारचे 52 पुरस्कार प्रदान करण्यात आले.
ज्येष्ठ अभिनेत्या उषा नाडकर्णी तसेच चित्रपट सृष्टीतील असंख्य मान्यवर तसेच आमदार डॉ. बालाजी किणीकर, भाजपा प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले-पाटील, सुनिल चौधरी, प्रज्ञा बनसोडे, राजेंद्र घोरपडे, संभाजी शिंदे, हेमंत गोगटे, सर्जेराव सावंत, कमर काझी आदींच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.
सिने नाट्य क्षेत्रात अनेक वर्षापासून काम करतो, वयाच्या 80 वर्षांपर्यँत एकही पुरस्कार मिळाला नाही, तरीही अंतू बरवा आणि सूर्यास्त मधील गायकवाड यांच्या भूमिकांमुळे रसिकांशी प्रेम जडले. त्या दोन्ही भूमिकांमुळे पुरस्कार मिळाला असे जयंत सावरकर यांनी सांगितले.
सावरकर यांच्या लग्नाचा 61 वा वाढदिवस केक कापून साजरा केला गेला.