ठाणे रेल्वे स्थानकाचा ‘विस्तार’ ६५ कोटींनी वाढला!

ठाणे: विस्तारित ठाणे रेल्वे स्टेशनच्या कामाला विलंब होत असल्याने पाच वर्षात ६५ कोटींचा खर्च वाढला आहे. दरम्यान पावसाळ्यानंतर हे काम अतिशय जलद गतीने होणार असल्याचा दावा ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी केला आहे.

ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी मुलुंड आणि ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान मनोरुग्णालयाच्या जागेवर विस्तारित रेल्वे स्थानक उभारण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिका प्रशासनाने केंद्र सरकारकडे पाठवला होता. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली होती. या स्थानकाचे काम रेल्वेमार्फत करण्यात येणार असून ठाणे महापालिका रेल्वेला निधी देणार आहे.

२०१७-१८ या आर्थिक वर्षात त्यासाठी ११९.३२ लाख इतक्या खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला होता. मनोरुग्णालयाचा भूखंड आरोग्य विभागाच्या ताब्यात होता. हा भूखंड एका पारशी दानशूर व्यक्तीने रुग्णालयाकरिता दिला होता. त्याचा वापर इतर कारणासाठी करण्यात येणार असल्याने काही जणांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. न्यायालयाने भूखंड देण्यास स्थगिती आदेश दिला होता. तो आदेश मार्च २०२३ला उठवला होता, त्यामुळे कामाला विलंब झाला होता.

जागा हस्तांतरित करण्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे, त्यामुळे रेल्वेच्या कामातील अडथळे दूर झाले असून पावसाळ्यात रेल्वे प्रशासन निविदा प्रक्रिया पूर्ण करून पावसाळ्यानंतर या रेल्वे स्थानकाचे काम गती घेईल, असा विश्वास महापालिकेतील एका अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.
खर्च वाढला आहे, त्याची मागणी राज्य सरकारकडे केली जाणार असल्याचे अधिकारी म्हणाले.

हे रेल्वे स्थानक झाल्यास ठाणे रेल्वे स्थानकावरील किमान ३०टक्के ताण कमी होण्याची शक्यता आहे. घोडबंदर, वागळे, वर्तकनगर, कळवा, बाळकुम आणि ठाणे पूर्व भागातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. त्यांच्या वेळेची बचत होऊन वाहतूक कोंडीतून त्यांची सुटका होणार असल्याचे महापालिकेतील एक अधिकारी म्हणाला.