मुंबई: नैऋत्य मान्सून आता अंदमान समुद्राच्या काही भागात दाखल झाला आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. पुढील तीन ते चार दिवसात दक्षिण बंगालच्या उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान, निकोबारच्या आणखी काही भागांमध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. तर 4 जून रोजी मान्सून केरळात दाखल होणार आहे.
साधारण 22 मे रोजी मान्सून हा अंदमानात दाखल होत असतो, या वर्षी मात्र तीन दिवस आधीच हा मान्सून दाखल झाल्याचे चित्र आहे. यावर्षी मान्सूनचे आगमन चार दिवस उशीरा होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे दरवर्षी 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होणारा मान्सून हा या वर्षी 4 जून रोजी दाखल होणार आहे.
दरवर्षी मान्सूनची वाटचाल कशी असते?
22 मे – अंदमान
1 जून – केरळ
7 जून – महाराष्ट्र
स्कायमेट या खाजगी एजन्सीनंही अंदमानमध्ये मान्सून उशिरानं दाखल होण्याचा अंदाज वर्तवला आहे. पण यंदा मान्सूनची सुरुवात कमकुवत दिसतेय. त्यामुळं तो विलंबाने दाखल होईल असा अंदाज स्कायमेटच्या शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात 9 जून आणि मुंबईत 15 जूनपर्यंत मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात 9 जून तर मुंबईत 15 जूनपर्यंत मान्सूनचं आगमन
वेगारीस ऑफ द वेदरकडून केरळात मान्सून उशिरा दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 4 जूनपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात 9 तारखेपर्यंत आणि मुंबईत 15 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होणार असल्याचं भाकित वेगारीस ऑफ द वेदरने वर्तवलं आहे.