घोलाईनगर डोंगरावरील ५०० झोपड्यांवर बुलडोझर!

वन विभागाची कारवाई

ठाणे: पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन वन विभागाने महापालिकेच्या साहाय्याने कळवा येथील घोलाई नगर येथील डोंगरावर बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या ५०० झोपड्यांवर बुलडोझर फिरवला.

कळवा पूर्व भागातील वन विभागाच्या जागेवर भूमाफियांनी गरिबांकडून पैसे घेऊन झोपड्या बांधण्यास जागा दिल्या होत्या. या भागातील काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि भूमाफिया यांनी या भागात शेकडो झोपड्या उभारल्या होत्या. त्याबाबत तक्रार करण्यात आली होती. तरी देखील झोपड्या कमी होण्याऐवजी वाढत होत्या.

वन विभागाच्या जागेवर या झोपड्या झाल्याने महापालिका त्याच्या विरोधात कारवाई करण्यास तयार नव्हती, परंतु पावसाळ्यात दरड कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वन विभागाचे सहायक वन अधिकारी श्री. सुर्वे यांच्या पथकाने ठाणे महापालिकेच्या साहाय्याने घोलाईनगर, वाघोबा नगर या परिसरातील ५०० झोपड्या हटविण्याची कारवाई केली आहे. त्यामुळे पारसिक डोंगरावरील वनसंपदा नष्ट होण्यापासून वाचली आहे. कारवाई करण्यात आलेल्या ठिकाणी पुन्हा झोपड्या उभ्या राहणार नाहीत याची काळजी वन विभागाने घ्यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केली आहे.