ठाणे : कासारवडवली, कळवा आणि उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविणाऱ्या रेकॉर्डवरील तिघा गुंडांवर ठाणे पोलिसांनी एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. या तिघांची रवानगी पुढील एक वर्षासाठी पुण्याच्या येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
ठाण्यातील कुख्यात गुंड धीरज उर्फ विकी रेड्डी (29) याच्यावर कासारवडवली पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, खंडणी, गंभीर दुखापत करणे, दुखापत करणे, जिवे ठार मारण्याची धमकी देणे, दमदाटी करणे, शिवीगाळ आणि हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी एमपीडीएअंतर्गत कारवाई करीत आरोपीला एक वर्षाकरिता पुणे येरवडा कारागृहात पाठवले आहे. कळवा पोलीस ठाण्यात सोनू पवार (26) या गुन्हेगारावर जबरी चोरी, घरफोडी, गंभीर दुखापत, जिवे ठार मारण्याची धमकी देणे, शिवीगाळ करणे यांच्यासह सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्यावर ठाणे पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. त्याची देखील येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.
तिसरी कारवाई उल्हासनगर शहरात करण्यात आली. उल्हासनगर शहरातील कुख्यात गुंड जग्गु सरदार उर्फ जगदीश लबाना (42) याच्यावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात खंडणी, दुखापत, विनयभंग, धमकी देणे असे सहा गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला देखील ठाणे पोलिसांनी एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले आहे. या तिघा गुंडांना स्थानबद्ध करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत झोन एक, चार आणि पाचच्या पोलीस उपायुक्तांनी 18 मे रोजी काढले आहेत.