अखेर ठामपाला मिळाला पूर्ण वेळ वैद्यकीय आरोग्य अधिकारी

ठाणे: अनेक वर्षानंतर ठाणे महापालिकेला पूर्ण वेळ मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी मिळाला असून मुंबई महापालिकेतील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतना के यांची ठाणे महापालिकेत प्रतिनियुक्तीवर बदली झाली आहे.

ठाणे महापालिकेतील मुख्य वैद्यकीय अधिकारी हे पद शासनाकडील आहे, परंतु ठाणे महापालिकेत स्थानिक अधिकाऱ्यांना प्रभारी पदभार दिला जात होता. राज्य शासनाकडील अधिकारी देखिल मोठ्या प्रमाणावर असलेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे महापालिकेत येण्यास तयार नव्हते, परंतु आता प्रशासकीय राजवट असून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी राज्य सरकारकडे वैद्यकीय अधिकारी पदाची मागणी केली होती, त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली असून डॉ. चेतना के यांची बदलीने नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना मुंबई येथील रुग्णालयात काम केल्याचा अनुभव आहे, त्यामुळे ठाणे महापालिकेच्या रुग्णालयातील कारभार सुधारून ठाणेकरांना चांगली आरोग्य सुविधा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.