दोन रशियन तरुणींची सुटका
ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील एका आलिशान हॉटेलमध्ये ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने छापा मारून दोन रशियन तरुणींची देहविक्रीच्या दलदलीतून सुटका केली. या प्रकरणी एका दलालावर वागळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यात एक दलाल मोबाइलवर ग्राहकांना विदेशी तरुणींचे फोटो पाठवून तसेच विदेशी तरुणींना पैशाचे आमिष दाखवून अनैतिक व्यवसाय चालवत असल्याची माहिती ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकास मिळाली होती. त्यानुसार 17 मे रोजी ठाण्यातील वागळे स्टेट परिसरातील हॉटेल द्वारकाच्या स्वागत हॉल परिसरात छापा मारला. यावेळी घटनास्थळी दोन रशियन तरुणी आढळून आल्या. या तरुणींना शरीरविक्रेय करण्यास भाग पाडण्यात येत असल्याचे पोलीस तपासातून समोर आले. या दोघा रशियन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. हा व्यवसाय चालवणाऱ्या एका दलालावर वागळे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा दलाल ग्राहकांशी वेबसाईट, सोशल मीडिया व फोन वरून संपर्क साधत त्यांना हाय फ्रॉफाईल व विदेशी मुली शरीरसंबंधासाठी पुरवत असे. तसेच विदेशी तरुणींना टुरिस्ट विजावर भारतात बोलावून हा दलाल त्यांना शरीरविक्रय करण्यास भाग पाडत होता.
रमण नामक हा दलाल फरार झाला असून तो दिल्ली, गोवा, जयपूर, गुजरात आदी परिसरात देखील सेक्स रॅकेट चालवत असल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले आहे. तर सुटका करण्यात आलेल्या रशियन तरुणींची सुधारगृहात रवानगी करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली.